मीरा रोड : भाईंदर पूर्वेतील नवघर रोडवर एका सदनिकेत चालणारा वेश्या व्यवसाय पोलिसांनी गुरुवारी उघडकीस आणला. पती कामावर आणि मुलगा शाळेत गेल्यानंतर गृहिणीच घरात वेश्या व्यवसाय चालवत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, पोलिसांनी महिलेस अटक केली असून, येथून २३ वर्षांच्या तरुणीची सुटका केली आहे.
भाईंदर पूर्वेच्या नवघर मार्गावरील संजय अपार्टमेंटमध्ये सदनिका क्र. २०१ मध्ये कांतीदेवी नावाची महिला वेश्या व्यवसाय चालवत असल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलिसांच्या अनैतिक वाहतूक प्रतिबंधक शाखेचे सहायक निरीक्षक देविदास हंडोरे यांना मिळाली. त्यांनी ही बाब नवघर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत पाटील यांना सांगितल्यावर पाटील आणि हंडोरे यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या पथकाने बनावट ग्राहक पुढे करून सापळा रचला. या ग्राहकाने कांतीदेवीशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधल्यानंतर तिने वेश्यागमनाचे ५०० रुपये आणि स्वत:चे कमिशन एक हजार रुपये सांगितले.
सौदा ठरवून बोगस ग्राहकाने कांतीदेवीचे घर गाठले. ठरलेली रक्कम घेऊन तिने २३ वर्षीय तरुणी वेश्यागमनासाठी उपलब्ध करून दिली. खात्री पटताच पोलिसांनी छापा टाकून कांतीदेवी ऊर्फ सीमा उमेंद्र शाह (३२) या वेश्या व्यवसाय चालवणाºया महिलेस अटक करून तिच्याजवळून रोख २५०० रुपये आणि मोबाइल आदी जप्त केले.पोलिसांनी कांतीदेवीची चौकशी केली असता, तिचा पती सकाळी कामावर, तर मुलगा दुपारी शाळेत जात असल्याने दिवसभर घरी कुणीच नसते. त्यामुळे पैशांसाठी ती घरात वेश्या व्यवसाय चालवत असल्याचे तिने सांगितले.
पीडितेच्या पतीचा मृत्यू
पीडित तरुणीच्या पतीचे निधन झाले असून, कांतीदेवीने तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत पैशांचे आमिष दाखवले. नंतर, तिला वेश्यागमनासाठी भाग पाडल्याचे पीडित तरुणीने सांगितले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल आरोपी महिलेस अटक केली.