उल्हासनगर : कॅम्प नं-४ येथील वेगवेगळ्या ३ डान्स बारवर मध्यवर्ती पोलिसांनी छापा टाकून ५० बारबालासह ७८ ग्राहकांवर कारवाई केली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून विठ्ठलवाडी पोलिसांच्या कारभारावर टीका होत आहे.
उल्हासनगरात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या बार, रेस्टॉरंट, फास्टफूड कॉर्नर, डान्सबार यांच्यावर कारवाईची मागणी मनसेचे मैनूद्दीन शेख यांनी मध्यवर्ती पोलिसाना निवेदन देवुन केली होती. त्यानंतर मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय वाघमारे यांनी रविवारी पहाटे २ वाजता कॅम्प नं-४ येथील श्रीराम चौकातील १०० डेज, लाईव्ह ९० व ॲपल डान्सबारवर छापा टाकून ५० बारबाला व ७८ ग्राहकावर कारवाई केली असून असुन त्यांच्याकडून लाखो रुपये जप्त केले.
शहरात गेल्या आठवड्यात एका मद्यधुंद कार चालकांनी दोन रिक्षासह काही कारला धडक दिल्याने, तिघांचा मृत्यू तर ३ जण जखमी झाले होते. याप्रकरणी कारचालकाला अटक करून पोलीस चौकशी करीत आहेत. शहरात उशिरा पर्यंत बार, डान्सबार, रेस्टॉरंट, फास्टफूड कॉर्नर सुरू राहत असल्याने अपघाताच्या व गुन्हेगारीच्या घटनेत वाढ झाल्याचा आरोप होत आहे. तसेच मध्यवर्ती पोलिसांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या डान्सबारवर छापा टाकून कारवाई केल्याने, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या कारभारावर टीका होत आहे.