डोंबिवली - वाशिंद रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांनी रेल रोको केला. लोकल वाहतूक उशिरानं सुरु असल्याने संतप्त प्रवाशांनी आंदोलन केलं. आधीच दाट धुक्यामुळे मध्य रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असताना, लोकल थांबवून एक्स्प्रेस सोडल्याने प्रवासी संतापले. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे स्थानकावरच रेल रोको आंदोलन सुरु केले. मिळालेल्या माहितीनुसार 5 वाजून 2 मिनिटांची लोकल जवळपास सहा वाजता रेल्वे स्थानकावर पोहोचली होती. मात्र यानंतरही एक्स्प्रेसला मार्ग करुन दिला जात असल्याने प्रवासी संतापले आणि रेल रोको करण्यास सुरुवात केली. दरम्यान 8.30 च्या सुमारास वाशिंद रेल्वे स्थानकातून लोकल रवाना झाली आहे. सेंट्रल रेल्वेची सीपीआरओ सुनील यांनी पुढील रेल्वे सेववर परिणाम होत असल्याने प्रवाशांना अशाप्रकारे आंदोलन न करण्यात आवाहन केलं आहे.
धुक्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरु असून, मुंबईकडे येणा-या गाड्या खोळंबल्या आहेत. अनेक लोकल आसनगावला ट्रॅकवरच उभ्या आहेत. सकाळची वेळ असल्याने अनेकजण आपल्या कार्यालयांमध्ये पोहोचण्यासाठी रेल्वे स्थानकांवर उभे आहेत. पण ट्रेन नसल्याने त्यांना उशीर होत आहे.
मुंबईसह अनेक ठिकाणी आज दाट धुकं पसरलं असल्याचं पहायला मिळत आहे. राज्यात थंडीचा पारा चांगलाच चढू लागला आहे. एकीकडे मुंबईकर गुलाबी थंडीचा अनुभव घेत असताना, दुसरीकडे धुक्यामुळे प्रवासात अडचणी निर्माण होत आहेत. फक्त रेल्वेच नाही, तर रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. हायवेंवरील वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. धुक्यामुळे पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूकही धीम्या गतीने सुरु आहे. बोरीवली - दहिसर लिंक रोडवर वाहतुक धीम्या गतीने सुरू आहे. धुक्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे.