नारायण जाधवठाणे : एमयूटीपी-३ अंतर्गत मध्य रेल्वेचा बहुचर्चित कळवा-ऐरोली उन्नत मार्ग, पनवेल-कर्जतदरम्यानचा नवा उपनगरीय मार्ग, तसेच पश्चिम रेल्वेच्या विरार-डहाणू विस्तारीकरणासाठी भारतीय रेल्वेला निधीची चणचण भासू लागली आहे. यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने जागतिक बँकेकडे सहा हजार कोटी रुपये कर्जाची मागणी केली आहे. एमयूटीपी-३ या संपूर्ण प्रकल्पाचा पहिला टप्पा एकूण १० हजार ९४७ कोटी खर्चाचा असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.यात कल्याण-डोंबिवलीसह ठाणे आणि नवी मुंबई शहराच्या विकासात महत्त्वाचा वाटा असलेल्या कळवा-ऐरोली उन्नत मार्गासह दिघा रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. दिघा स्थानक उभारणीसाठीही रेल विकास महामंडळाने हालचाली सुरू केल्या आहेत. या स्थानकाच्या उभारणीसाठी रेल्वे पहिल्या टप्प्यात ५५ कोटी रुपये खर्च करणार आहे. सध्या ठाण्यानंतर ऐरोली हे स्थानक आहे. या दोन्ही स्थानकांतील अंतर ५.७६ किमी आहे. रेतीबंदरनजीकचा उन्नत मार्ग आणि दिघा रेल्वे स्थानक हे दोन्ही प्रकल्प कळवा-ऐरोली या ४२८ कोटींच्या उन्नत मार्गाचाच भाग आहे. दिघा रेल्वे स्थानक येत्या तीन वर्षांत उभे करण्याचा रेल्वेचा मानस आहे. जागतिक बँकेने हे कर्ज मंजूर केल्यास, या प्रकल्पासह नव्याने विकसित करण्यात येणाऱ्या पनवेल-कर्जत या नव्या उपनगरीय मार्गासही चालना मिळणार आहे.सध्या एमएमआरडीए क्षेत्रात सर्वात जास्त विकास पनवेल-कर्जत-खालापूर क्षेत्रात होत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना क्षेत्रात या परिसराचा समावेश झाल्याने नजीकच्या भविष्यात पनवेल-कर्जत उपनगरीय मार्ग गरजेचा आहे. आताच या परिसरात मोठमोठ्या टाउनशिप उभ्या राहत आहेत. त्यातच मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेचा विस्तार, विरार-अलिबाग कॉरिडोर आणि जेएनपीटी ते दिल्ली डेडिकेट फं्रटिअर कॉरिडोरमुळे या परिसरात येत्या काळात मोठ्या प्रमाणात उद्योगांसह मानवी वस्ती वाढणार आहे. यामुळे भविष्याची ही चाहूल ओळखून मुंबई रेल्वे विकास महामंडळाने पनवेल-कर्जतदरम्यान नवा उपनगरीय मार्ग प्रस्तावित केला आहे.सध्या २८ किमीच्या या मार्गावर मालवाहतुकीसह एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूक सुरू आहे, परंतु त्यावर उपनगरीय वाहतूक सुरू करायची झाल्यास मोठा खर्च अपेक्षित आहे. यात नवीन मार्ग टाकणे, उपनगरीय स्थानकांचा विकास, विद्युतीकरणाचे जाळे, दोन उड्डाणपूल, तीन टनेल, १३ भूमिगत मार्ग, ४५ लघू पूल, दोन आरओबी, भूसंपादनासह वनविभागाच्या परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. मात्र, एकंदरीत या परिसराचा विकास लक्षात घेता, नजीकच्या भविष्यात या नव्या उपनगरीय मार्गास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार आहे.विरार-डहाणू या मार्गाचा विस्तारपश्चिम रेल्वेवरील सध्या सर्वात जलद विकास विरार-डहाणूदरम्यान होत आहे. मुंबई-अहमदाबादच्या विस्तारीकरणासह आता नियोजित वाढवण बंदरासह बुलेट ट्रेन आणि जेएनपीटी ते दिल्ली डेडिकेट फ्रंटिअर कॉरिडोरमुळे या परिसराचाही विकास झपाट्याने होत आहे. त्यामुळे भविष्यातील वाहतूक ओळखून पश्चिम रेल्वेने विरार-डहाणू या ६३ किमी मार्गाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेकडे पैशांची चणचणकळवा-ऐरोली उन्नतमार्गासह पनवेल-कर्जत आणि विरार-डहाणू मार्गाचा विस्तार या तिन्ही प्रकल्पांसाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाची विशेष हेतू कंपनी म्हणून निवड झाली आहे, परंतु रेल्वेकडे पैशांची चणचण आहे.कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी), या सुमारे १५ ते २० हजार कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाचा ५० टक्के हिस्सा रेल्वेस देण्यास महाराष्ट्र शासनाने नकार दिला आहे. यातील चर्चगेट-विरार धिमा मार्ग आणि सीएसटी-पनवेल धिम्या मार्गांसाठीच्या १३ हजार कोटींहून अधिक खर्चाची जबाबदारी राज्य शासनाने सिडको, एमएमआरडीएसह मुंबई आणि नवी मुंबई महापालिकेवर ढकलली आहे.सर्व महापालिकांनी यासाठी निधी देण्यास नकार दिला आहे. यामुळे रेल्वे विकास महामंडळाने आता एमयूटीपी-३ अंतर्गत, कळवा-ऐरोली उन्नत मार्ग, पनवेल-कर्जतदरम्यानच्या नव्या उपनगरीय मार्गासह पश्चिम रेल्वेच्या विरार-डहाणू मार्गाच्या विस्तारीकरणासाठीही वर्ल्ड बँकेपुढे हात पसरला आहे.
रेल्वेची वर्ल्ड बँकेकडे सहा हजार कोटी कर्जाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 6:20 AM