शहापूर : मध्य रेल्वेवरील खर्डी व कसारा स्थानकांदरम्यान असलेल्या उंबरमाळी स्थानक येथे रेल्वे बोर्डाने अधिकृत थांबा जाहीर केला आहे. आता लोकल हमखास येथे थांबणार आहेत. उंबरमाळीप्रमाणेच तानशेत स्थानकावरही अधिकृत थांब्याचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. अधिकृत थांबा जाहीर झाल्यामुळे प्रवाशांची आता फरफट थांबणार आहे.काही वर्षांपासून आसनगाव ते कसारादरम्यान तानशेत व उंबरमाळी येथील आदिवासींच्या सोयीसाठी अनधिकृत लोकल थांबवल्या जात होत्या. या भागातील आदिवासींना दळणवळणाचा पर्याय नसल्यामुळे वर्षानुवर्षे रेल्वेकडून सहानुभूतीने विचार केला जात होता. मात्र, अधिकृत थांबा नसल्यामुळे काही वेळा मोटारमनकडून गाडी थांबवली जात नसे. त्यामुळे शेकडो आदिवासींची फरफट होत होती. या पार्श्वभूमीवर उंबरमाळी व तानशेत येथे अधिकृत थांबा मंजूर करण्यासाठी कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर्स असोसिएशन, कर्जत-कसारा-कल्याण (के-३) या संघटना कित्येक वर्षांपासून प्रयत्न करत होते. तसेच खासदार कपिल पाटील यांच्याकडून सतत पाठपुरावा केला जात होता. अखेर, रेल्वे बोर्डाने शुक्रवारी उंबरमाळी येथे अधिकृत थांबा जाहीर केला. यासंदर्भात रेल्वे बोर्डाने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा यांना पत्र पाठवले आहे.या निर्णयामुळे आता उंबरमाळी येथे दररोज लोकल थांबणार आहेत. त्याचबरोबर रेल्वे प्रवाशांना चढउतार करण्यासाठी तात्पुरते फलाट उभारण्यात येतील. या भागात प्रवाशांची संख्या वाढल्यास भविष्यात नवे रेल्वे स्थानक सुरू करण्याचाही निर्णय होणार आहे. त्यामुळे उंबरमाळी रेल्वेस्थानकाची नांदी झाली असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, आटगाव ते खर्डीदरम्यान तानशेत येथेही लोकलला अधिकृत थांबा देण्याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे अंतिम टप्प्यात आहे. \आदिवासी प्रवाशांना मिळाला दिलासाउंबरमाळी येथे लोकलच्या तात्पुरत्या थांब्याला परवानगी मिळाल्यामुळे शेकडो आदिवासी प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. भविष्यात या ठिकाणी निश्चितच रेल्वेस्थानक उभारले जाईल. उंबरमाळीप्रमाणेच तानशेत येथील थांब्यालाही लवकरच परवानगी मिळेल, अशी माहिती खासदार कपिल पाटील यांनी दिली.
उंबरमाळी स्थानकात रेल्वेचा अधिकृत थांबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:13 AM