कल्याण : कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रेल्वेच्या हद्दीतील रस्त्याचे कामही आता कल्याण-डोंबिवली महापालिकेने हाती घेतले असून, ते पूर्णत्वाला आले आहे. दुसऱ्या बाजूकडील पत्रीपुलाला जोडणाऱ्या या रस्त्याचे कामही तातडीने पूर्ण केले जाणार आहे. कल्याण-डोंबिवलीला ये-जा करण्यासाठी पूर्वी कल्याण-शीळ हा एकमेव मार्ग होता. परंतु, या मार्गावरील वाहतूक कोंडी तसेच इंधनाचा अपव्यय टाळण्यासाठी केडीएमसीने काही वर्षांपूर्वी कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्ता प्रस्तावित केला होता. आतापर्यंत या रस्त्यावर ५० कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च झाली आहे. राष्ट्रीय रस्ते मानांकनाप्रमाणे या मार्गाच्या दोन्ही बाजूस चार-चार फुटी पदपथ आहे. नागरिक त्याचा वापर जॉगिंग ट्रॅक म्हणून वापर करत आहेत. तसेच येथे सेल्फी पॉइंट उभारण्यात आला आहे. रेल्वे समांतर रस्ता रस्त्याचा काही भाग रेल्वेच्या हद्दीत येतो. त्यासाठी महापालिकेने रेल्वेकडे पाठपुरावा केला. रेल्वेकडून परवानगी मिळाल्याने आता २४ मीटरच्या अंतिम टप्प्यातील काम सुरू झाले आहे. लवकरच हा रस्ता पत्रीपुलाला जोडला जाणार आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर सध्या वापरात असलेला रस्ता बंद केला जाणार आहे. दरम्यान, पत्रीपुलानजीकचे काम संथगतीने सुरू असल्याबाबत केडीएमसीचे कार्यकारी अभियंता प्रशांत भुजबळ यांना विचारले असता त्यांनी ते लवकरच पूर्ण केले जाईल, असे ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)विद्रुपीकरणाकडे कानाडोळा समांतर रस्त्यालगत पुन्हा बेकायदा टपऱ्या उभारण्यात आल्या आहेत. मटणाची दुकाने, पानटपऱ्या, वेल्डींगची दुकाने, ढाबे, गाड्या धुवण्याचे सेंटर थाटण्यात आले आहे. या अतिक्रमणांकडे मध्यंतरी शिवसेना नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी लक्ष वेधले होते. एकीकडे स्मार्ट सिटीचे स्वप्न बघितले जात असताना दुसरीकडे समांतर रस्त्यावर होत असलेल्या या विद्रुपीकरणाकडे महापालिकेचे होत असलेले दुर्लक्ष चर्चेचा विषय बनले आहे. बाइक राइडर्सचा धुमाकुळ मिनी मरीन ड्राइव्ह संबोधल्या जाणारा हा रस्ता शहराच्या सौंदर्यात भर टाकणारा असताना दुसरीकडे मात्र या रस्त्यावर बाइक राइडर्सचा धुमाकूळ सुरू असतो. कल्याणकडे जाणाऱ्या लेनवर गतिरोधक नाहीत. त्यामुळे कर्णकर्कश आवाजाचे सायलन्सर असलेल्या बाइक्स येथे अतिवेगाने चालवल्या जातात. त्यामुळे अन्य वाहनचालक व पादचाऱ्यांना जीव मुठीत धरूनच वाट काढावी लागते. तुटपुंजे बळाचे तुणतुणे वाहतूक पोलिसांकडून सातत्याने वाजवले जात असल्याने या राइडर्सना रोखायचे तरी कसे? असा सवाल उपस्थित होत आहे.
रेल्वे समांतर रस्ता लवकरच पत्रीपुलाला जोडणार
By admin | Published: May 03, 2017 5:20 AM