ठाणे :रेल्वे स्थानकावर मिळणाऱ्या आरोग्यदायी आणि आरोयुक्त शुद्ध पाण्याबाबत ठाणेरेल्वे प्रशासनाकडे तक्रारी येण्यास सुरूवात झाल्याची बाब पुढे आली आहे. या तक्रारीत त्या पाण्याच्या शुद्धतेवर प्रवाशांनी बोट ठेवल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या तक्रारींची दखल घेत रेल्वे प्रशासनाने पाण्याचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी धाडल्याचे सांगितले जात आहे.
कल्याण स्थानकापाठोपाठ ठाणे रेल्वे स्थानकात आरो प्रणालीच्या चार आॅटोमॅटिक वॉटर व्हेंडिंग मशिन्स २०१७ मध्ये बसविण्यात आल्या आहेत. फलाट क्रमांक एक, दोन, सात आणि नऊ नंबर त्या बसवल्या आहेत. या मशिनसाठी लागणारे पाणी रेल्वेकडून अल्प किंमतीत उपलब्ध करून दिले जाते. त्यानंतर मशीनद्वारे ते पाणी ७ वेळा फिल्टर होते. या शुद्ध पाण्यामुळे डोकेदुखीचा त्रास कमी होतो, शरीराचे तापमान नियंत्रित होते, सांधे आणि स्नायुसाठी आवश्यक, पचनक्रि येसाठी उपायकारक, वजन घटविण्यास ते उपयुक्त ठरते. त्याचबरोबर शरीरामध्ये द्रव पदार्थाचे प्रमाण कायम राखते, त्वचेला उजाळा येतो. शरीरामध्ये उर्जा वाढविण्यासाठीही या पाण्याचा वापर होतो. या मशिनद्वारे अवघ्या पाच रु पयात एक लिटर पाणी प्रवाशांच्या बाटलीत भरून दिले जाते. बाटली उपलब्ध नसल्यास आठ रुपये आकारले जातात. या मोबदल्यात स्वच्छ आणि थंडगार पाणी मिळत असल्याचा असा दावा संबंधित कंपनीने त्यावेळी केला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मशिन्सद्वारे मिळणाºया पाण्याचा दर्जा घसरल्याने त्याबाबत ठाणे रेल्वे प्रशासनाकडे तक्रारी येण्यास सुरूवात झाली आहे. बाटली नसलेल्या प्रवाशांना देण्यात येणाºया बाटल्या ठेवण्याबाबतही संबंधितांकडून कोणतीही काळजी घेण्यात येत नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
अशाप्रकारे मध्य रेल्वेच्या प्रत्येक स्थानकांवर एक -दोन किंवा त्यापेक्षाही जास्त मशिन्सद्वारे प्रवाशांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावे, यासाठी रेल्वे प्रशासनाने मशिन्स बसविण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. ठाण्यात बसवलेल्या मशिन्सद्वारे मिळणाºया पाण्याप्रमाणेच इतर रेल्वेस्थानकातही मिळत असल्याची भिती प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. त्यानुसार सर्व रेल्वे स्थानकावर मशिन्सद्वारे मिळणाºया पाण्याचे नमूने तपासणीसाठी पाठवावे, अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे.
मशिन्सद्वारे अल्प किंमतीत मिळणाऱ्या शुद्ध पाण्याबाबत प्रवाशांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ठाणे रेल्वे स्थानकातील चारही मशिन्सचे पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.
- सुरेश नायर, संचालक, ठाणे रेल्वे स्थानक