लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : धावती रेल्वे पॅसेंजर पकडण्याच्या प्रयत्नात असलेली एक प्रवासी महिला हात सटकल्यामुळे रेल्वे आणि फलाटाच्या मध्ये पडली. ती फरफटत जात असल्याचे पाहून त्याठिकाणी गस्तीवर असलेल्या रेल्वेपोलिसाने जीवाची बाजी लावून तिला सुखरूपपणे बाहेर काढून तिचा जीव वाचविल्याची घटना शुक्रवारी दुपारी ठाणे रेल्वेस्थानकात घडली. या घटनेने तिच्या कुटुंबीयांसह उपस्थित रेल्वे प्रवाशांनीही टाळ्या वाजवून बहादूर पोलिसाचे अभिनंदन केले. मात्र, गाडी सुटण्याच्या घाईत ती निघून गेल्याने तिचे नाव समजू शकले नाही.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक ६ वर ८ नोव्हेंबर रोजी दुपारी १.५० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी-दादर पॅसेंजर (अप) ही रेल्वे सुरू झाली होती. गाडीने वेग पकडलेला असतानाच ३० वर्षीय महिला चालती गाडी पकडण्याचा प्रयत्न करीत होती. गाडी पकडत असतानाच तिचा हात सुटून ती गाडी आणि फलाटाच्या मध्ये पडली. त्यातच ती फरफटत जात असताना फलाटावर गस्त घालत असलेले पोलीस हवालदार ए.व्ही. सोनार यांनी या महिलेला आपल्या जीवाची पर्वा न करता गाडीच्या खाली जात असतानाच तिला पकडले. त्यानंतर तिला ओढून त्यांनी सुखरूपरीत्या तिचे प्राण वाचविले. तिचा चार वर्षांचा मुलगा आणि वडील गाडीत चढले होते म्हणून तिने गाडी पकडण्याचा प्रयत्न केला. या गाडीची चेन पुलिंग झाली. गाडी थांबताच वडिलांसह मुलाने त्याठिकाणी धाव घेतली. तिला सुखरूप पाहून कर्तव्यावरील पोलिसाचे तिच्या वडिलांनी आभार मानले.