मुंब्रा : मुंब्रा रेल्वेस्थानकाच्या फलाट क्र मांक २ वर बुधवारी सकाळी ८ वाजून २२ मिनिटांनी सीएसटीच्या दिशेने धावणारी महिला विशेष लोकल पकडण्याच्या नादात शारदा या महिलेचा एक पाय डब्यात आणि दुसरा फलाटावर राहिला. यामुळे ती काही पावले फलाटावर फरफटत गेली. हे दृश्य पाहून पाहणाऱ्यांच्या काळजाचा काही क्षण ठोका चुकला. मात्र, त्याचवेळी दिव्यांगाच्या डब्याजवळ कर्तव्य बजावत असलेले रेल्वे पोलीस हसन पटेल यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून प्रसंगावधान राखून स्वत:चा जीव धोक्यात घालून डब्याजवळ जाऊन त्या महिलेला फलाटावर खेचून तिचा जीव वाचवला.या धावपळीत पटेल यांच्या हाताला खरचटले. तिला फलाटावर खेचण्यासाठी क्षणाचाही विलंब झाला असता तर कदाचित ती लोकलचा डबा आणि फलाटावरील पोकळी (गॅप) यामधून थेट रेल्वे रुळांवर पडून दगावली असती, अशी माहिती आरपीएफचे पोलीस उपनिरीक्षक (मुंब्रा रेल्वे स्टेशन) ए.के. यादव यांनी लोकमतला दिली.
रेल्वे पोलिसाने वाचवला महिलेचा जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:34 AM