कल्याण : परप्रांतातून येणाऱ्या रेल्वे गाड्यांमधून कल्याणला येणारे प्रवासी आरटी - पीसीआर टेस्ट न करताच येत आहेत. त्यामुळे कल्याणमध्ये पुन्हा कोरोना पसरू शकतो. अशा परप्रांतीय प्रवाशांवर कल्याण- डोंबिवली महापलिका आणि रेल्वे पोलीस करडी नजर ठेवणार आहेत. त्यासाठी बुधवारी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रेल्वेस्थानकास भेट देऊन पाहणी केली.
या पाहणी दौऱ्याच्या वेळी रेल्वेचे एरिया मॅनेजर प्रमोद जाधव यांच्यासह महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील, रेल्वे पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने इत्यादी उपस्थित होते. सध्या कल्याण रेल्वेस्थानकात अँटिजन टेस्टिंगचे एकच सेंटर सुरू आहे. त्यामुळे आणखी दोन सेंटर सुरू केली जातील. त्यानंतर एकूण तीन टेस्टिंग सेंटर होतील. या तिन्ही सेंटरवर सकाळी ७ ते ११ आणि ४ ते ५ वाजेपर्यंत टेस्टिंग काऊंटर टेबल लावून प्रवाशांची अँटिजन टेस्ट केली जाणार आहे. सकाळच्या वेळेत उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालमधून लांब पल्ल्याच्या गाड्या कल्याण रेल्वेस्थानकात दाखल होतात. या परप्रांतीय रेल्वे प्रवाशांची रेल्वेस्थानकात टेस्ट केल्याशिवाय त्यांना शहरात प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी दिली.
सध्या महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. रुग्णसंख्या कमी करण्यासाठी कडक निर्बंध लादले आहेत. त्याचबरोबर लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जात आहे, अशा परिस्थितीत रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्यांतून कल्याणमध्ये दाखल होणाऱ्या परप्रांतीय प्रवाशांची टेस्ट काळजीपूर्वक केली गेली नाही तर शहरात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. ही गंभीर बाब लक्षात घेऊन आयुक्तांनी ही पाहणी केली आहे. एकही प्रवासी अँटिजन टेस्टशिवाय शहरात प्रवेश करणार नाही, याची खबरदारी रेल्वे, महापालिका आणि रेल्वे पोलीस घेणार आहेत, असेही आयुक्तांनी यावेळी सांगितले. टेस्ट न करताच शहरात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करता येते का, याचाही प्रशासनाकडून विचार केला जाणार असल्याचे आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.
शहरात विनाकारण मोकाट फिरणाऱ्यांवर ज्या प्रकारे महापालिका आणि पोलिसांची कारवाई सुरू आहे. त्याच धर्तीवर रेल्वेस्थानकातील परप्रांतीय प्रवाशांवर नजर ठेवली जाणार आहे.
ज्या रेल्वे स्थानकातून प्रवास सुरू होतो. त्याच राज्यातील प्रवाशाने प्रवास सुरू करण्यापूर्वी ४८ तास आधीचा आरटी-पीसीआर निगेटिव्हचा रिपोर्ट जवळ ठेवून प्रवास सुरु करायचा आहे. कल्याणमध्ये लांब पल्ल्याच्या गाड्यातून येणारे परप्रांतीय ९० टक्के प्रवासी आरटी-पीसीआरचा निगेटिव्ह असलेला अहवाल न घेताच प्रवास करीत असल्याची बाब उघड झाली होती.
--------------------------