अंबरनाथ : वांगणी रेल्वे स्थानकात अंध महिलेच्या मुलाला रेल्वे अपघातातून वाचवणाऱ्या मयूर शेळके यांनी आता देशवासीयांना रक्तदान आणि प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले आहे. मी एका चिमुकल्याला जीव धोक्यात घालून वाचवू शकतो तर, आपण देखील कोणत्याही प्रकारचा जीव धोक्यात न घालता केवळ रक्तदान आणि प्लाझ्मा दान करून इतरांचे जीव वाचवू शकता, असा संदेश त्याने दिला आहे.
आपला जीव धोक्यात घालून एका चिमुकल्याचा जीव वाचवणारा मयूर शेळके याचे कौतुक किंवा राज्यातच नव्हे तर देशभरातून होत आहे त्याचा अनेकांकडून सत्कार देखील केला जात आहे. त्याने केलेल्या शौर्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. अशातच शेळके यांनी त्याच्या हितचिंतकांना आणि त्याच्या चाहत्यांना आता अनोखा संदेश देऊन राष्ट्र जपण्याचा प्रयत्न केला आहे. देश आणि महाराष्ट्र कोरोनासारख्या महाभयंकर आजाराशी लढत असल्याने रक्ताचा तुटवडा भासत आहे. सोबतच प्लाजमा देखील उपलब्ध होत नाही. मी माझा जीव धोक्यात घालून जर एखाद्या चिमुकल्याला वाचवू शकतो तर आपण देखील रक्तदान करुन कोणाचातरी जीव वाचवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. अंध महिलेच्या मुलाचा जीव वाचवल्यानंतर मला जे समाधान मिळाले आहे, तेच समाधान तुमच्या वाट्याला देखील येईल. त्यासाठी तुम्ही देखील पुढाकार घ्या आणि रक्तदान व प्लाजमा दान मोहिमेत सहभागी व्हा असेही, त्यांनी म्हटले.