डोंबिवली - मध्य रेल्वे प्रशासनाचे रडगाणे हे प्रवाशांसाठी नवे नाही. कधी रुळाला तडा, कधी सिग्नल यंत्रणेत बिघाड, कधी ओव्हरहेड वायर तुटणे, कधी रुळावर पाणी, कधी अपघात तर कधी संप या अशा अनेक कारणांमुळे रेल्वेचा खोळंबा होत असतो. या सर्वाचा सर्वाधिक फटका ठाण्याच्या पुढे राहणाऱ्या प्रवाशांना अधिक बसतो. मुंब्रा स्थानक सोडल्यास पुढे दिवा स्थानक आणि त्या पुढे जाण्यास अन्य सोईस्कर मार्गच उपलब्ध नाही. जे अन्य मार्ग आहेत ते अधिक वेळ काढू आणि खर्चिक असल्याने प्रवाशांकडून त्याचा वापर फार कमी प्रमाणात केला जातो.
ठाणे-कल्याण रेल्वे समांतर रस्त्याची मागणी रेल्वेच्या प्रत्येक खोळंब्यानंतर समोर येत असून तो मार्ग तातडीने तयार करावा अशी मागणी दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अॅड. आदेश भगत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
मध्य रेल्वे रखडल्यानंतर दिवा, डोंबिवली आणि त्या पुढील प्रवाशांना अन्य मार्ग उपल्बध नसल्याने त्यांना आपल्या नोकरीच्या ठिकाणी वेळेत पोहचणे शक्य होत नाही. अशातच रेल्वेची उद्घोषणा व इंडिकेटर सुविधा वेळेवर होत नसल्याने खोळंबलेल्या प्रवाशांचा अधिक उद्रेक होतो. दिवा स्थानकात झालेले प्रवासी आंदोलन हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. या आंदोलनामुळे मध्य रेल्वे सेवा संपूर्ण एक दिवस बंद पडली होती. दिवा स्थानकात झालेल्या आंदोलनानंतर टिटवाळा, आसनगाव अशा इतर स्थानकात देखील आंदोलने झाली. या सर्व आंदोलनामागे सातत्याने रेल्वेचा होणारा खोळंबा आणि अन्य पर्यायांची नसलेली उपलब्धता, हेच प्रमुख कारण होते.
ठाणे कल्याण समांतर रस्ता या बहुचर्चित विषयाला खरी बगल ही जलवाहतूक सेवा या नवीन विषयामुळे. ही जलवाहतूक सेवा जरी लोकउपयोगी असली तरी रेल्वे प्रवाशांच्या या समस्येवर तोडगा काढणारी निश्चितच नाही. त्यामुळे समांतर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे.
आज देशाच्या दुर्गम भागात रस्ते वा दळणवळणाच्या अन्य सुविधा पोहचवण्याचे काम आपण यशस्वीपणे पार पाडत आहात. पण हातावर पोट घेऊन जगणारे चाकरमानी आणि पगार कापला जाईल या भितीने जीवाची पर्वा न करता लटकत जाणारे रेल्वे प्रवासी यांच्या करिता आता अन्य मार्ग शोधणे गरजेचे आहे. ठाणे कल्याण रेल्वे समांतर रस्ता हा मोठा पर्याय आहे असे आम्हाला वाटते. या विषयातील आपली सकारात्मक भूमिका आम्हा लाखो प्रवाशांसाठी नवसंजीवनी ठरेल यात तीळ मात्र शंका नाही. कृपया सहकार्य करावे असेही भगत यांनी पत्रात नमूद केलं आहे.