- अनिकेत घमंडी, डोंबिवलीअनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ठाकुर्ली रेल्वे उड्डाणपुलाच्या प्रत्यक्ष कामाला दिवाळीच्या शुभमुहूर्तावर मध्य रेल्वेने सुरुवात केली. येथील जोशी हायस्कूलजवळील क्रॉस रोडलगत पूर्वेला या ब्रीजचा पाया खोदण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या पाचहून अधिक वर्षे रेल्वे आणि कल्याण-डोंबिवली महापालिका यांच्या आडमुठ्या धोरणात अडकलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे १० लाख डोंबिवलीकरांचा प्रवास आता सुकर होणार आहे. सुमारे १३ कोटींचा हा उड्डाणपूल आहे. त्यालगतच केडीएमसीचाही एक प्रकल्प असून मोठा स्कायवॉक बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेनेही एकूण ४० लाखांची तरतूद केली आहे.सध्या ठाकुर्ली रेल्वे फाटकामुळे मध्य रेल्वेला प्रतिदिन ४० मिनिटांचा विलंब होतो. फाटक उघडले की, शेकडोच्या संख्येने वाहने पूर्व-पश्चिमेस जा-ये करतात. त्यामुळे वेळेत फाटक बंद होत नाही. परिणामी, त्याचा फटका अप-डाऊनच्या धीम्या/जलद रेल्वे वाहतुकीला बसतो. विशेषत: सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत अशा घटनांमुळे लाखो प्रवाशांना ताटकळावे लागते. अनेकदा ट्रक-डम्पर रेल्वे ट्रॅकमध्ये अडकल्याचाही त्रास प्रशासनासह वाहनचालकांना होतो. तो होऊ नये, यासाठी त्या ठिकाणी उड्डाणपूल होणे आवश्यक होते. लाखो नागरिकांची ही मागणी होती, परंतु आधी रेल्वे आणि नंतर महापालिकेच्या तांत्रिक मुद्यांमुळे त्यास विलंब झाला होता. स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तत्काळ तो मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. मध्यंतरीच्या काळात आचारसंहिता होती. तसेच महापालिका निवडणुका होत्या. त्या कालावधीत येथील काम सुरू नव्हते. परंतु, गेल्या आठवड्यापासून कामाची सुरुवात झाली आहे.रेल्वेने त्या कामाला सुरुवात केली आहे. ते गरजेचे होते. स्कायवॉक बांधण्यासाठी टेंडर मागवले आहेत. त्यानंतर, त्याची सुरुवात करण्यात येईल. - प्रमोद कुलकर्णी, प्रकल्प अभियंता, केडीएमसी
रेल्वे उड्डाणपुलाचे काम मार्गी
By admin | Published: November 17, 2015 1:49 AM