- अनिकेत घमंडीडोंबिवली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही महिन्यांपासून सुरू असलेला लॉकडाऊन आणि त्यातच कंत्राटदारांकडील मजूर गावी गेल्याने ठाणे जिल्ह्यात सुरू असलेले रेल्वेचे विविध प्रकल्प आणि पायाभूत सोयीसुविधांची कामे रखडली आहेत. त्यामुळे आॅगस्टनंतर लोकल, लांब पल्ल्यांच्या गाड्या सुरू झाल्यास सर्वसामान्य प्रवाशांना या सुविधांपासून वंचित राहावे लागणार आहे. त्याचबरोबर या प्रकल्पांचा खर्चही वाढण्याची भीती आहे.रेल्वेस्थानक व गाड्यांमधील गर्दीतून कोरोना पसरू नये, यासाठी सर्वसामान्यांसाठी २२ मार्चपासून रेल्वेसेवा बंद झाली. आॅगस्टपर्यंत ही सेवा सुरू होणार नाही. १५ जूनपासून केवळ अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा काही प्रमाणात सुरू झाली आहे. त्यामुळे सध्याच्या लॉकडाऊनचा फायदा घेऊन रेल्वे प्रशासनाने पादचारी पूल, उड्डाणपूल, रेल्वेमार्गांचा विस्तार तसेच विविध प्रकल्प मार्गी लावावेत, अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे. मात्र, ठिकठिकाणच्या कंत्राटदारांचे मजूर गावाला गेल्याने रेल्वे प्रकल्पांची कामे पुढे सरकलेली नाहीत.पादचारी पुलांची कामे मार्च, एप्रिलमध्ये पूर्ण करण्याचा रेल्वेचा मानस होता. ठाणे स्थानकात कळवा दिशेकडील, डोंबिवली स्थानकातील कल्याण दिशेकडील तर, ठाकुर्ली, कोपर स्थानकात मुंबई दिशेकडे पादचारी पुलांचे काम सुरू झाले आहे. त्यापैकी ठाकुर्ली स्थानकातील पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्या पुलावर छप्पर टाकणे, लादी, दिवे, इंडिकेटर लावणे अद्याप बाकी आहे. डोंबिवली स्थानकातील पादचारी पुलाचा गर्डर बसवण्यासाठी मे महिन्यात दोन विशेष ब्लॉक घेण्यात आले. परंतु, या पुलावरही छप्पर, सरकता जिना व लाद्या बसवणे, वीजपुरवठा करणे आदी कामे बाकी आहेत. ठाणे स्थानकातील दोन पादचारी पूल, टिटवाळा, आसनगाव, खडवली तसेच शहाड स्थानक येथील पादचारी पुलांची कामे वेगाने पूर्ण होण्याची गरज आहे. कोपर स्थानकात दिव्याच्या दिशेला पादचारी पुलासाठी पाया खोदला आहे. परंतु, ते काम पुढे सरकलेले नाही. पुलाची ही कामे न झाल्यामुळे लोकल सुरू झाल्यानंतर गर्दीतून वाट काढताना तसेच फिजिकल डिस्टन्सिंग पाळताना प्रवाशांच्या नाकीनऊ येणार आहे.रेल्वेच्या कंत्राटदारांकडील परराज्यांतील कामगार आणखी काही दिवस लॉकडाऊन उघडणार नाही, या शक्यतेने आपल्या गावी निघून गेले आहेत. त्यामुळे कंत्राटदारांची पंचाईत झाली आहे. अशाच पद्धतीने रेल्वेमार्गांवरील डोंबिवलीतील कोपर दिशेकडील उड्डाणपूल व कल्याणमधील पत्रीपुलाचे कामही अन्य यंत्रणांमुळे रखडलेले आहे. पत्रीपुलाचे काम एमएसआरडीसी मार्चमध्ये करणार होती. परंतु, लॉकडाऊनपासून काम रेंगाळलेले आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांची पूलकोंडीतून सुटका झालेली नाही.कोपर उड्डाणपुलाचे लॉकडाऊनमध्ये काम सुरू झाले असले, तरीही त्याला गती मिळत नसल्याने पावसाळ्यात ते काम पूर्ण होऊ शकणार नाही, हे चित्र स्पष्ट आहे. कोपर, पत्रीपुलासाठी रेल्वेकडून ब्लॉक मिळणे अत्यावश्यक आहे. रेल्वे पूर्णपणे सुरू होण्याआधीच त्यासाठी नियोजन करून ते मार्गी लावता येऊ शकते. पण त्या दृष्टीने रेल्वे आणि अन्य यंत्रणांच्या हालचाली सुरू नसल्याचे निदर्शनास येत आहे.कल्याण-कसारा व कल्याण-कर्जतदरम्यान तिसरी व चौथी रेल्वेमार्गिका टाकण्याचे प्रकल्प रखडले आहेत. या मार्गिकांचे सर्वेक्षण झाले असले, तरी कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे अजून काही वर्षे तरीही कल्याणपुढील कसारा, कर्जत, खोपोलीच्या प्रवाशांना रखडतच प्रवास करावा लागणार आहे. महत्त्वाकांक्षी पाचव्या-सहाव्या रेल्वेमार्गिकेचा प्रकल्प दिवा ते ठाणेदरम्यान रखडला आहे.होम प्लॅटफॉर्मचे कामही प्रलंबितलॉकडाऊनमुळे आसनगाव, बदलापूर स्थानकांमधील होम प्लॅटफॉर्मचे काम प्रलंबित असून, ते कधी पूर्ण होणार हे देखील आताच सांगता येणार नसल्याने त्या स्थानकांमधील प्रवाशांची गैरसोय कायम आहे. कल्याण स्थानकाचे रिमॉडेलिंग सुरू झालेले नाही. वांगणी स्थानकातील पादचारी पूल, उड्डाणपुलाचे काम बाकी आहे.कर्जत-पनवेलदरम्यान दुसरी लाइन, दिवा-विरार मार्गावर लोकल सुरू करणे, अशा विविध प्रकल्पांची घोषणा झालेली असली तरी काम मात्र प्रत्यक्षात कुठेही सुरू झालेले नसल्याने ते एक दिवास्वप्नच राहणार का? असा सवाल केला जात आहे.
कोरोनामुळे रेल्वेची कामे रखडली, ठाणे-दिवा पाचव्या-सहाव्या मार्गिकेला ब्रेक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 1:42 AM