ठाणे : सर्वसामान्यांची जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या उपनगरी रेल्वेमध्ये विसरलेली बॅग असो अथवा रेल्वे स्थानकावर गहाळ झालेली बॅग असो. या पुन्हा आपल्याला परत मिळतीलच याची शाश्वती नसते. असे असतानाच रेल्वे कर्मचाऱ्यांकडून या वस्तूंचा शोध घेत, गेल्या अडीच महिन्यात रेल्वे प्रवासात गहाळ अथवा विसरलेली राेकड, सोन्याचे दागिने, मोबाईल, लॅपटॉपसह महत्वाची कागदपत्रे असलेल्या ५० प्रवाशांच्या बॅगा सुखरूप परत केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने बुधवारी दिली.
ऐतिहासिक ओळख असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकात स्थानकात लाखाे प्रवाशांची वर्दळ असते. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत लोकलमध्ये चढणे किंवा उतरणे हेही एक दिव्यच असते. याच दरम्यान जवळच्या महत्वाच्या वस्तू विसरण्याचे प्रकार प्रवाशांकडून घडतात. स्थानकात लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेसही थांबत असल्याने या गाड्यांमध्ये वस्तू राहण्याचे प्रकार घडतात. रेल्वेत राहिलेल्या वस्तू किंवा सामान परत मिळेल का ? या संभ्रमातच प्रवासी ठाणे रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात तक्रार करतात. परंतू रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे अशा अनेक वस्तू परत मिळाल्या. मार्च ते १५ मे २०२३ या अडीच महिन्यात सुमारे ५० प्रवाशांना त्यांचा किमती ऐवज परत केला.
रेल्वेतच नव्हे तर मत्स्यगंधा एक्सप्रेसमध्ये राहिलेल्या बॅगेतही लाखो रुपयांचे दागिने होते. ही किंमती बॅग lदेखील प्रवाशाला मिळवून देत, त्यांची मदत करीत वस्तू मूळ मालकाला परत केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. अगदी अलिकडे ठाण्यातील फलाट क्रमांक १० वर वाशी ट्रेनमध्ये एका प्रवाशाची सुमारे ७५ हजाराची रोकड असलेली पिशवी विसरली हाेती. रेल्वे सफाई कर्मचाऱ्याने त्याची ही बॅग ठाणे रेल्वे व्यवस्थापक केशव तावडे यांच्याकडे आणून दिली. पिशवीमध्ये पैसे आणि कागदपत्रे होती. कोणताच सुगावा नसताना, पिशवी शोधत स्टेशन मास्तर कार्यालयात आलेल्या या प्रवाशाला त्याची ही पाऊण लाखाची पिशवी सुपूर्द केली.
चिपळूणला रेल्वेत बसून ठाणे स्थानकात उतरल्यावर माझी बॅग रेल्वेत राहिली. यामध्ये दोन मोबाईल, साडेचार हजार रुपये, घड्याळ असा असा ऐवज होता. स्टेशन मास्तर केशव तावडे यांच्या कार्यालयाने बॅगेचा शोध घेतला. माझे सर्व सामान सुखरुप हाेते. रेल्वे कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार.- मीरा जाधव, प्रवासी, ठाणे.