बदलापूर: बदलापूर रेल्वेस्थानकात लिफ्ट उभारण्याचे सुमारे दोन महिन्यांपूर्वी सुरू केलेले काम अखेर थांबविण्यात आले आहे. होम प्लॅटफॉर्मच्या कामानंतर उभारण्यात येणारा रेल्वे पादचारी पूल याठिकाणी उतरणार असल्याचे लक्षात आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे; मात्र त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या या नियोजनशून्य कारभाराविषयी संताप व्यक्त होत आहे.
बदलापूर रेल्वेस्थानकात फलाट क्रमांक ३ वर तिकीटघराच्या बाहेर लिफ्ट बसविण्यास मार्च महिन्यात सुरुवात झाली होती; मात्र आता होम प्लटफॉर्मच्या कामानंतर उभारण्यात येणारा रेल्वे पादचारी पूल याठिकाणी उतरणार असल्याचे रेल्वेच्या लक्षात आले. त्यामुळे प्रशासनाने हे काम थांबवून लिफ्ट उभारणीसाठी खोदलेला खड्डा बुजविल्याची माहिती रेल्वेच्या अभियंत्यांनी दिली. रेल्वे पादचारी पुलाचे काम एमआरव्हीसीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. याबाबतची माहिती नसल्याने रेल्वेच्या मुंबई विभागीय कार्यालयाने या लिफ्टचे काम सुरू केले होते; मात्र याची माहिती एमआरव्हीसीला मिळाल्यानंतर त्यांनी याबाबत रेल्वेच्या मुंबई विभागीय कार्यालयाला कळविले. त्यानुसार मुंबई विभागीय कार्यालयाने लिफ्टचे काम थांबविण्याचे आदेश दिल्यानंतर ते बंद केल्याची माहिती या अभियंत्यांनी दिली.
वास्तविक ज्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर ही लिफ्ट बसविण्यात येत होती, त्याच प्लॅटफॉर्मवर स्वयंचलित जिनाही आहे. दुसरी बाब म्हणजे फलाट क्रमांक ३ वर कर्जतकडून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्याच थांबतात. विशेष म्हणजे फलाट क्रमांक ३ लगत रस्ता आहे. येथून बाहेर पडण्यासाठी असलेल्या तीन मार्गावरून थेट रस्त्यावर येता येत असल्याने पश्चिम भागात जाणारे प्रवासीच या स्वयंचलित जिन्याचा वापर करतात. याउलट फलाट क्रमांक १ व २ संलग्न असून, याठिकाणी बदलापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या व मुंबईहून बदलापूरकडे व कर्जत-खोपोलीकडे येणाऱ्या लोकल थांबतात. त्यामुळे स्वाभाविकच फलाट क्रमांक ३च्या तुलनेत फलाट क्रमांक १ व २ वर प्रवाशांची गर्दी अधिक असते. त्यामुळे ही लिफ्ट संलग्न असलेल्या फलाट क्रमांक १ व २ वर असणे अपेक्षित होते; परंतु रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक ३ वर लिफ्ट बसविण्याचे काम सुरू केल्याबद्दल प्रवासी संताप व्यक्त करीत होते.