ठाणे - तलवांचे शहर म्हणून ओळख असलेल्या ठाणे शहराची ओळख ही खड्यांचे शहर म्हणून झाली आहे. या संदर्भातील विदारक चित्र रिपोर्टर आॅन दि स्पॉटच्या माध्यमातून समोर आल्या नंतर आता पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यानुसार आता खड्डे बुजविण्यासाठी रेन कॉंक्रीटचा वापर केला जाणार आहे. येत्या दोन दिवसात तब्बल ५० टन मटेरीलअल मागविले जाणार आहे. शिवाय खड्डे बुजविण्यासाठी वाढीव ६० लाखांची तरतूद केली जाणार असल्याचेही पालिकेच्या सुत्रांनी स्पष्ट केले. पावसाने उसंत घेतल्याने आता शहरातील अनेक भागात एकाच वेळेस खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग आला आहे.
ठाणे शहरात दरवर्षी पावसाळा सुरु झाला की, खड्यांवरुन वातावरण तापलेले असते. यंदा रस्त्यांना खड्डे पडणार नसल्याचा दावा पालिकेने केला होता. परंतु पालिकेचा हा दावा पावसाने खोटा ठरविला आहे. ठाण्यात अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे दिसून आले. शहरात आजच्या घडीला १६०७ खड्डे असून त्यातील ३२७ खड्डे बुजविण्यात आले असून १२८ खड्डे बुजविण्याचे शिल्लक असल्याची माहिती पालिकेने दिली. परंतु जे खड्डे बुजविण्यात आले होते, ते पुन्हा उखडले आहेत. त्यामुळे आता पावसाने उसंत घेतली असल्याने पालिकेच्या तब्बल २५ टीम दिवसरात्र खड्डे बुजविण्याच्या मोहीमेच्या कामी लागली आहे. सध्या आर.एम.सी. पध्दतीने खड्डे बुजविले जात आहेत. तर येत्या दोन दिवसात ५० टन रेन कॉंक्रीट मागविले जाणार आहे. या कॉंक्रीटच्या पध्दतीने रस्त्यावरील खड्डे भर पावसातही बुजविले जाऊ शकणार आहेत. हे एक पॉलीमर कॉंक्रीट असल्याने पावसातही खड्डे बुजविणे या तंत्रज्ञानामुळे सहज शक्य होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे.या कामासाठी सध्या १५ लाखांची मंजुरी घेण्यात आली आहे. तर उर्वरीत खड्डे बुजविण्यासाठी वाढीव ६० लाखांची तरतूद केली जाणार असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली. तसेच २ कोटींची जी तरतूद करण्यात आली आहे. त्याचे काम पावसाळा संपल्यानंतर सुरु होणार आहे. ही तरतूद केवळ डांबरी रस्त्यांसाठी करण्यात आली असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले.