ठाणे: मागील काही दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवार पासून दमदार हजेरी लावली आहे. शनिवारी देखील सकाळपासून पावसाने आपली संततधार सुरूच ठेवली होती. शनिवारी सकाळपासून कोसणाऱ्या पावसामुळे ठाणे शहरात मगील आठ तासात 120 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. या कोसळणाऱ्या पावसामुळे शहरात भिंत पडणे, झाड व झाडांच्या फांद्या पडणे यांसह ठिकठिकाणी पाणी साठण्याच्या घटना देखील घडल्या आहेत.
सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने देण्यात आली. तर, या पावसाचा परिणाम रेल्वे सेवेवर देखील झाल्याने रेल्वे नियमित वेळेपेक्षा उशिराने धावत होती. ठाणे शहरात शुक्रवार पासून सुरु झालेल्या पावसाने शिनिवारी देखील आपले बरसणे सुरूच ठेवले होते. त्यामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला होता. शनिवारी कोसळणाऱ्या पावसामुळे वागळे इस्टेट येथील खेतले गार्डन येथे 10 ते 12 फुट उंचीची भिंत पडल्याची घटना घडली.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित आणि वित्तहानी झाली नाही. तर, चरई, खारकर आळी आणि कोपरी मीठ बंदर रोड येथे झाडे पडण्याच्या घटना घडल्या. तसेच नौपाडा, ब्रम्हांड, वसंत विहार आदी ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्याच्या घटना घडल्या आहे. तर, गोकुळ नगर, माजिवडा, वंदना सिनेमागृह, अशोक सिनेमा, कोपरीतील ठाणेकरवाडी, वागळे इस्टेट, तीन पेट्रोल पंप, पाचपाखाडी, तसेच शहरातील मुख्य बाजार पेठ आदी 12 ठिकाणी पाणी तुंबल्याचे पहायला मिळाले. या मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालकांना यातून मार्ग काढताना चांगलीच कसरत करावी लागत होती.
दरम्यान, शनिवारी दिवसभर कोसळणाऱ्या पावसाचा रेल्वे सेवेवर देखील त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले.त्यात पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारे नाल्यांची सफाई पूर्ण झाली नसल्याने ठाणे आणि कळवा स्थानक येथील रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्याचे दिसून आले. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम होवून लोकल ट्रेन नियमित वेळेपेक्षा उशिराने धावत होती.