लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रात ‘ताऊते’ चक्रीवादळ निर्माण झाले असल्याने ठाणे जिल्ह्यात वादळी पावसासह ताशी ४० ते ६० कि.मी. वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्यातील सहा महापालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषद व पोलीस यंत्रणेसह आपत्ती नियंत्रण व व्यवस्थापनास दिले.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या सूचनेनुसार अरबी समुद्रात वादळसदृश स्थिती शुक्रवारी निर्माण झाली आहे. लक्षद्वीप, केरळ, तामिळनाडू व कर्नाटक समुद्र किनाऱ्यावर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्रासह जिल्ह्यात व गोवा किनाऱ्यावर ताशी ४० ते ६० कि.मी. वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यामध्ये कोरोना नियंत्रणात आणणे व रुग्णांवर उपचार करण्याचे मोठे आव्हान आहे. कोविड रुग्णालयामधील रुग्णांना पुरविण्यात येणारा ऑक्सिजन आणि वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. ठाणे जिल्ह्यात यापूर्वी ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाल्याने काही रुग्णांना प्राण गमावावा लागला होता. वादळाच्या परिस्थितीत वैद्यकीय सेवा प्रभावित होणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे.
आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णांना स्थलांतरित करण्यासाठी रुग्णवाहिका, वैद्यकीय कर्मचारी तैनात ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. शहरातील वेगवेगळ्या भागांतील वीज पुरवठा कार्यालयातील प्रमुख अधिकारी कामावर हजर राहतील व महापालिका आपत्कालीन नियंत्रण कक्ष त्यांच्या सतत संपर्कात राहील याबाबत नियोजन करण्यात आले आहे.
------ पूरक जोड आहे..
........