सुरेश लोखंडे
ठाणे : जिल्ह्यात सध्या सायंकाळी पडणाऱ्या परतीच्या पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात कमीतकमी सध्यातरी पाच ते सहा हजार हेक्टरवरील हाती आलेल्या भाताचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पावसाचे पाणी शेतात साचल्याने कापलेला भात त्यात सडून १५ टक्के भातशेतीचे नुकसान झाले आहे. या पंचनामे वेळीच करून भरपाईची मागणी शेतकरी करत आहेत.
यंदा भातचे उत्तम व दर्जेदार पीक शेतकऱ्यांच्या हाती आले होते. परंतु, अवकाळी पावसामुळे कापून ठेवलेल्या भाताला कोंब येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सरासरी २९.८ मिमी पाऊस पडला आहे. सहा तालुक्यांमध्ये सर्वाधिक ६४ मिमी पाऊस उल्हासनगर परिसरात नोंदवला असला, तरी कृषी विभागाच्या सर्कलमधील कल्याण अप्परमध्ये ९४ मिमी, मुरबाडच्या देहारीत ७३, अंबरनाथच्या कुंभार्लीच्या माळरानावर ६४, शहापूरच्या खर्डी भागात ४५ मिमी हा अवकाळी पाऊस पडला आहे. यात शेंद्रुण, खर्डी, डोळखांब भागात कापलेला भात वाहून गेल्याचे शेतकरी प्रकाश भांगरथ यांनी सांगितले. यंदा हेक्टरी सरासरी २४ क्विंटल भात खराब झाला आहे.यंदा ५४,५०० हेक्टरवर हळवे चार टक्के, निमगरवे चार टक्के, गरवे भाताचे पीक १०५ टक्के सर्वसाधारण क्षेत्रावर आहे. त्यात जया, रतना, मसुरी, कर्जत - ७, ३, २, ५, रत्नागिरी ७, ५, २४ व एमटीयू १०१० या भाताच्या जाती महाबीजच्या आहेत. तर कंपन्यांच्या कोमल, सोनम, रुपाली, वायएसआर, मोहिनी, पूनम आदी जातींनी भातशेती बहरली आहे.
सर्व तालुक्यांत १५ ते २० टक्के भातशेतीचे नुकसानजिल्ह्यात सध्या परतीच्या अवकाळी पावसामुळे भातशेतीचे नुकसान होत आहे. कल्याण, मुरबाड तालुक्यांतील भातशेतीच्या नुकसानीची गुरुवारीच पाहणी केली आहे. कापून पडलेला भात साचलेल्या पाण्यात बुडाला आहे. उभा असलेला भात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे खाली पडला आहे. सर्व तालुक्यांतील भातशेतीच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज घेता १५ ते २० टक्के भातशेतीचे नुकसान झाले आहे. यापैकी अंदाजे पाच ते सहा हजार हेक्टरवर लागवड केलेल्या भाताचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या सर्व नुकसानीची पाहणी सुरू केलेली आहे. - अंकुश माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
भरपाई त्वरित मिळावीयावर्षी चांगलं पीक आलं होतं. भात कापून करपे शेतात सुकण्यासाठी टाकले असता झालेल्या जोरदार पावसाने पूर्ण पीक गेले तीन-चार दिवस शेतातच भिजत आहे. आता दाण्यांना कोंब आले आहेत. या नुकसानीची भरपाई मिळाली तरच माझा उदरनिर्वाह होईल. - संतोष लुटे, अघई, ता. शहापूर
पाण्यात भात सडलायंदा भात चांगला आला होता. दाणा ही चांगला टणक भरला होता. त्यामुळे संपूर्ण शेतातील भात कापून ठेवले होते. काही दिवसांत या भाताचा पेंढा बांधणार होताे. मात्र, दोन दिवसांच्या अवकाळी पावसाने हा भात सडत आहे. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने वेळीच पंचनामा करून भरपाई द्यावी. तरच कृषिकर्ज भरता येईल.- नामदेव भोईर, घोराळे, ता. मुरबाड