लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : गणेशोत्सवानंतर पडघम वाजू लागले आहेत ते नवरात्रोत्सवाचे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग सुरू आहे; परंतु गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा फटका देवीच्या मूर्तींना बसत असल्याची खंत मूर्तिकारांनी व्यक्त केली आहे. गणेशमूर्तींप्रमाणे देवीच्या मूर्तींच्या किमतीतही २५ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे मूर्तिकारांचे म्हणणे आहे.
७ ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्सवास सुरुवात होणार आहे. गणेशोत्सवानंतर काही दिवसांतच नवरात्रोत्सव येऊन ठेपल्याने मूर्तिकारांची कसरत सुरू आहे. कमी दिवस असल्याने वेळेत मूर्ती पूर्ण करून देण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. मात्र, पाऊस थांबतच नसल्याने मूर्ती सुकविणे कठीण जात आहे. मूर्ती लवकर सुकवायच्या कशा, असा प्रश्न मूर्तिकारांसमोर आहे. मूर्ती सुकविण्यासाठी विविध पर्याय मूर्तिकारांकडून अवलंबिले जात आहेत. यासाठी हॅलोजन किंवा भट्टीचाही वापर करावा लागत असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. दुसरीकडे रंगकामही सुरू आहे. दीड ते चार फुटांच्या मूर्ती बनविण्याचे काम सुरू आहे; परंतु दोन ते साडेतीन फुटांच्या मूर्तींना मागणी अधिक असल्याचे मूर्तिकार अरुण बोरीटकर यांनी सांगितले. यंदा मूर्तींच्या दरांत अधिक वाढ झाली आहे. मूर्तींवर लावण्यात येणाऱ्या हिऱ्यांमुळेही मूर्तीचे दर जास्त आहेत, असे बोरीटकर म्हणाले. दीड फुटांची मूर्ती अडीच हजार रुपये, तर चार फुटांची मूर्ती १२ हजार रुपयांना आहे.
सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींना मागणी
मूर्तींच्या बुकिंगला तीन दिवसांपासून सुरुवात झाली आहे. घरगुतीपेक्षा सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींना मागणी आहे. घरगुती नवरात्रोत्सवात बोटांवर मोजण्याइतक्याच मूर्ती खरेदी केल्या जातात. सार्वजनिक मंडळांना टेंभीनाक्याच्या प्रसिद्ध देवीसारखीच मूर्ती हवी असल्याचे मूर्ती विक्रेते सचिन मोरे यांनी सांगितले.
------------