डोंबिवली : गणेशोत्सवाच्या तोंडावर केडीएमसीने ‘फ’ प्रभागात ५० लाखांचे डांबरीकरण केल्याची माहिती उघड झाली आहे. शुक्रवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हे डांबर वाहून गेल्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. डांबरीकरणानंतर सिलीकोट न केल्यामुळे सारस्वत कॉलनी, पंचायत बावडी, मानपाडा पथ, भगतसिंग रस्त्यावर खडी बाहेर येऊ न रस्ते उखडले आहेत.
गेल्या आठवड्यात सारस्वत कॉलनी, पंचायत बावडी, मानपाडा पथ येथे आइस फॅक्टरीनजीक २०० मीटरचे पॅचवर्क केले. भगतसिंग रस्त्यावरही डांबर टाकले होते. मात्र, त्यावर सिलीकोट न करता अन्य प्रभागांत पॅचवर्कचे काम करण्यात आले. मात्र, शुक्रवारपासून पाऊ स आणि वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे डांबर वाहून गेले. त्यामुळे खडी बाहेर आली आहे. त्यामुळे पॅचवर्कच्या ठिकाणी पुन्हा खड्डे पडू लागले आहेत. खड्ड्यांमध्ये पाणी साचले असून वाहनांचा वेग मंदावल्यामुळे वाहतूककोंडीही वाढली आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ‘फ’ प्रभागात मान्सूनपूर्व व आता गणेशोत्सवापर्यंत खडीकरण, डांबरीकरणाचे जेवढे काम झाले आहे, ते ५० लाख रुपयांचे असेल, असे सांगण्यात आले. जेथे डांबरीकरण झाले आहे, तेथे त्वरित सिलीकोट मारायला हवा होता, जेणेकरून पावसामुळे रस्त्यांचे होणारे नुकसान कमी झाले असते, असेही ते म्हणाले.