राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत लोकांकडून फुलांचा वर्षाव, दुतर्फा गर्दी; मुंब्रा येथे उत्साह
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 05:39 AM2024-03-17T05:39:43+5:302024-03-17T05:40:18+5:30
यात्रेच्या स्वागतासाठी नागरिकांनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंब्रा: काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा शनिवारी ठाणे मार्गे मुंबईला मार्गस्थ झाली. या यात्रेची सुरुवात मुंब्रा शहरातील वाय जंक्शन येथून झाली. शहरातील एकमेव मुख्य रस्त्यावरून कळव्याच्या दिशेने निघालेल्या यात्रेचे नागरिकांनी उत्साहात स्वागत केले. यात्रेच्या स्वागतासाठी नागरिकांनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. गांधी यांच्या स्वागतासाठी काही ठिकाणी स्टेज उभारण्यात आले होते. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव गांधी यांनी स्टेजवर न जाता तेथे जमलेल्या नागरिकांना वाहनातून हात उंचावून अभिवादन केले. काही ठिकाणी जेसीबीतून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला.
रेती बंदर येथे उभारण्यात आलेल्या फ्रीडम फायटरला अभिवादन करण्यासाठी वाहनातून उतरलेल्या गांधी यांचे तुतारी वाजवून स्वागत करण्यात आले.
बायपास रस्त्यावरील वाहतूक रोखली
यात्रेनिमित्त सकाळपासून रस्त्यावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुख्य रस्त्यावरील अनेक दुभाजक बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आले होते. ज्या रस्त्यावरून यात्रा मार्गस्थ झाली. त्या रस्त्याच्या बाजूने फेरीवाल्यांच्या हातगाड्या तसेच टपऱ्या हटविण्याची कारवाई शुक्रवारी रात्री करण्यात आली. पार्क केलेल्या दुचाकी, रिक्षा, कार, पिकअप वाहने हटविण्यात आली होती. यात्रेमुळे मुंब्रा बायपास रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी रोखून धरली होती.
यात्रेत त्यांच्यासह आमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाचे मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष शमीम खान, ठामपाचे माजी विरोधी पक्षनेते अशरफ पठाण, समाजसेविका मर्जिया पठाण, पदाधिकारी उपस्थित होते.