ठाणे : बाहेर श्रावणातील सरी कोसळत असताना अत्रे कट्ट्यावर मात्र प्रेक्षकांनी शब्द सुरांचा पाऊस अनुभवला. हिंदी मराठी गीतांच्या मैफीलीत ठाणेकर रसिक न्हाऊन निघाले. ‘हृदयी वसंत फुलताना....’, ‘अश्वीनी ये ना...’ या गाण्यांवर रसिकांनी ठेका धरला. ७६ वर्षीय प्रतिभा कुलकर्णी यांनी आपल्या सुरेल आवाजात रसिकांची मने जिंकली. आचार्य अत्रे कट्ट्यावर बुधवारी स्वरांगिनी प्रस्तुत ही मैफील आयोजित केली होती.
ज्योती राणे यांनी ‘सारेगमप’ या गाण्याने सुरूवात केली. सुरेश चव्हाण यांनी ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘रिम झीम गिरे सावन’, प्रतिभा कुलकर्णी यांनी ‘बोल रे पपीहरा’, ‘ज्योती कलश झलके’, ‘ओ बसंती पवन’, संदीप वराडकर ‘प्रीतीच्या चांदराती’, ‘जिंदगी कैसी है पहेली’, ज्योती राणे यांनी ‘सत्यम शिवम सुंदरम’, विद्या सकपाळ यांनी ‘लाजरा हसरा श्रावण आला’, ‘रुपेरी वाळूत’ ही गीते सादर केली. द्वंद्व गीतांनी तर कट्ट्यावर धम्माल उडवली. रामकृष्ण राऊळ व विद्या सकपाळ यांनी ‘प्यार हुआ इकरार हुआ’ व ‘याद किया दिल ने कहाँ’, ज्योती राणे व विद्या सकपाळ यांनी ‘आला आला वारा’, संदीप वराडकर व प्रतिभा कुलकर्णी यांनी ‘संधीकाली’, सिद्धार्थ मोहीते व प्रतिभा कुलकर्णी यांनी ‘कुहु बोले रे पपी’ ही गीते सादर केली. जुन्या गीतांंत तर रसिक दंग झाले होते. सिद्धार्थ मोहिते यांनी किबोर्ड, हामोर्नियम मनोहर पवार तर प्रमोद कदम यांनी बाजू सांभाळली. वैशाली केकान यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. कार्यक्रमाला प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांची उपस्थिती होती. ७६ वर्षीय प्रतिभा कुलकर्णी यांनी या वयातही आपली गाण्याची आवड जोपासत असल्याने कट्टेकऱ्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. श्रावणातल्या सरी आणि शब्द सुरांचा पाऊस याचा मिलाप कट्ट्यावर जुळून आला होता. कट्ट्यावर बहुसंख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थइत होते. जुन्या काळातील गाणी सादर होताच गायकांबरोबर ते ही जागी बसून गुणगुणत होते.