डोंबिवली : सोमवारी पहाटेपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मध्य रेल्वेच्या ठाणे, कळवा स्थानकांत रुळांवर पाणी साचल्यामुळे धीम्या मार्गावरील लोकलसेवा सकाळी कार्यालयीन गर्दीच्या वेळी ठप्प झाली. त्यामुळे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आणि शहापूर येथील चाकरमान्यांनी दांडी मारून घरी बसणे पसंत केले. रविवारच्या सुटीला जोडून घरी राहण्यामुळे चाकरमानी मनोमन सुखावले.कल्याण स्थानकात शनिवारच्या तुलनेत सोमवारी कमी पाणी होते. मात्र, ठाणे व कळवा येथे रुळांवर पाणी साचल्याने लोकलसेवा विस्कळीत झाल्याने सर्वच स्थानकांत प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. जलद मार्गावरील लोकलसेवेलाही पावसाचा फटका बसला होता. अनेक शाळा-महाविद्यालयांनी पावसाचा वाढता जोर पाहून सुटी जाहीर केली. सकाळी ७ पासून लोकलसेवा सुरळीत होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या असंख्य चाकरमान्यांनी ९ नंतर घरी जाणे पसंत केले. दुपारी १२ नंतर पावसाचा जोर कमी झाल्याने कळवा स्थानकातील पावसाच्या पाण्याचा निचरा झाला. त्यानंतर, धीम्या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू झाली. त्यानंतर, मोजक्यात लोकांनी कामावर जाणे पसंत केले. जलद मार्गावरील वाहतूक सुरू असली, तरी मुंब्रा येथील पारसिकच्या बोगद्यादरम्यान वाहतुकीचा वेग मंदावलेला होता. शीव ते दादरपर्यंत लोकलची रखडपट्टी सुरू होती.विठ्ठलवाडी स्थानकालगत असलेल्या नाल्याला पुराचे स्वरूप आले होते. उल्हासनगर स्थानकालगतच्या वालधुनीला पूर आल्याने तेथूनही अप-डाउन करणाºया लोकलचा वेग मंदावला होता. टिटवाळा, आसनगाव परिसरांतही पावसाचा प्रचंड जोर होता. त्यामुळे तेथील लोकल विलंबाने धावत होत्या.पावसाचा जोर कमी झाल्यानंतर लोकलसेवा सुरू झाली. मात्र, जलद आणि धीम्या मार्गावरील लोकल पाऊण ते एक तास विलंबाने धावत होत्या. सायंकाळी उशिरापर्यंत वेळापत्रक कोलमडलेले होते. अनेकांनी दांडी मारल्याने लोकलला फारशी गर्दी नव्हती. लांब पल्ल्यांच्या गाड्याही विलंबाने धावत असल्याने प्रवासी नाराज झाले.‘प्लास्टिकचा कचरा साचू देऊ नका’कळवा व ठाणे रेल्वेस्थानकांत पाणी तुंबल्याच्या घटनांची नोंद घेत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा यांनी सोमवारी पाहणी केली. त्यावेळी ठाणे विभागातील रेल्वेस्थानकांमध्ये प्लास्टिकचा कचरा साचू देऊ नका, स्थानकात स्वच्छता राखा, असे आदेश स्थानक प्रबंधकांना दिल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.कल्याण : कल्याण-डोंबिवलीत सोमवारी पहाटेपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यातच दिवसरात्र काढण्याची वेळ नागरिकांवर आली. नेतिवली येथील होमबाबा टेकडीवर दोन ठिकाणी भिंती खचल्या. परंतु, जीवितहानी झाली नाही. अहिल्याबाई हरड यांच्या खोलीच्या एका बाजूची, तर दुसºया बाजूला असलेल्या खोलीचीही भिंत कोसळली.ठाण्यात ठिकठिकाणी ‘तलाव’ठाणे : शनिवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सोमवारी तिसºया दिवशीही ठाणे शहरात जोरदार हजेरी लावली. ठाणे शहरात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ८३.८० मिमी पावसाची नोंद झाली. सोमवारच्या पावसात शहरातील तब्बल ४३ ठिकाणी पाणी साचल्याच्या तक्रारी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला प्राप्त झाल्या. रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास येऊरगाव, वनीचापाडा येथे एका शेतविहिरीमध्ये पडून चंद्रकांत जानू गुरव (४३) यांचा मृत्यू झाला.तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन विभागाला यश आले. घोडबंदर येथे गायमुख मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक अन्यत्र वळवण्यात आली होती. मुंबईकडे जाणारी आणि येणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. कळवा-खारीगाव रोडही बंद केल्यामुळे या भागात वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या.शहरात श्रीनगर, वारलीपाडा, काच कंपनी येथे संरक्षक भिंत, रामनगर भागात साप्ते चाळ येथे नाल्याची भिंत, मुंब्रा शिवाजीनगर भागात घराची भिंत, किनारा बंगला येथे नाल्याची भिंत, मुंब्रा रेतीबंदर, आदिवासी कॉलनी घराची भिंत आणि संजयनगर भागात संरक्षक भिंत पडल्याची घटना घडली. गटार व टॉयलेटचे पाणी लोकांच्या घरात शिरल्यामुळे नागरिक हैराण झाले होते.घोडबंदर रोडवर अभूतपूर्व कोंडीसतत कोसळणाºया पावसामुळे काजूपाडा येथे पाणी साचून ठाणे-घोडबंदर मार्गावरील वाहतूक बंद पडली. काशिमीरा भागातील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागून वाहतूक ठप्प झाली. ठाणे-घोडबंदर मार्गालगतचे बेकायदा मातीभराव, मध्येच बांधलेल्या दुभाजकांमुळे येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचते. ठाण्याहून येणारे मीरा-भार्इंदर पालिका आयुक्त कोंडीत अडकले.मीरा-भार्इंदरमध्ये पूरस्थितीभार्इंदरच्या बेकरी गल्ली, डॉ. आंबेडकर मार्गनाका, राई मुख्य रस्ता, बाळाराम पाटील मार्ग, काशीनगर, शिवशक्तीनगर, खारीगाव या भागांत पूरस्थिती निर्माण झाली. अनेकांच्या घरांत आणि दुकानांत पाणी शिरल्याने नुकसान होऊन त्यांचे हाल झाले. वाहनांमध्ये पाणी शिरल्याने वाहने बंद पडली. शहरात पाणीउपसा करण्यासाठी पालिकेने लावलेले पंप कुचकामी ठरले.घरे अन् दुकाने पाण्याखाली...मीरा रोडच्या सिल्व्हर सरिता भागात कमरेपर्यंत पाणी साचले होते. घरे, दुकाने पाण्याखाली गेल्याने लोकांचे नुकसान झाले. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, महिला यांची ने-आण करण्यासाठी पालिकेला बोटी तैनात कराव्या लागल्या. या भागात झालेल्या प्रचंड मातीभरावामुळे दरवर्षी अशी परिस्थिती उद्भवते. दहिसर चेकनाका भागातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आणि येथील वाहतूक ठप्प झाली.सलग तीन दिवस पाऊसकोंडीभिवंडी : तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रविवारी रात्रीपासून पुन्हा जोर धरल्याने सोमवार शहरातील सखल भागात पुन्हा तुफान पाणी साचले. तीनबत्ती, शिवाजीनगर आणि ठाणगे आळीतील मच्छी आणि भाजी मार्केट पुन्हा पाण्याखाली गेले. खाडीकिनारी असलेल्या म्हाडा कॉलनीतील कुटुंबांना तसेच अजमेरनगर येथील डोंगराचा भाग खचल्याने २६ कुटुंबांना पालिकेच्या शाळेत हलवले.
पावसाने घडवली ‘दांडी’यात्रा, ठाणे, कळवा रेल्वेस्थानकांत पाणीचपाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 4:13 AM