ठाणे - शुक्रवारपासून मुंबईसह ठाणे जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळत आहे. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या परिसरात पावसाचा जोर कायम राहिल्याने अनेक सखल भागात पाणी साचलं. बदलापूर, अंबरनाथ रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकल सेवा थांबविण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला होता. पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा रात्रीपासून कामाला लागली आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एनडीआरएफच्या टीमलाही अंबरनाथ, बदलापूर स्टेशनला पाचारण करण्यात आलं. तसेच स्टेशनवर अडकून राहिलेल्या प्रवाशांसाठी चहा, बिस्कीट अशा खाण्याची सोय मध्य रेल्वेकडून करण्यात आली.
मुसळधार पावसामुळे अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या वळविण्यात आल्या आहेत. पंढरपूर-मुंबई फास्ट पॅसेंजर पुण्यापर्यंत थांबविण्यात येणार आहे. तसेच कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस, विशाखापट्टनम-एलटीटी एक्सप्रेस यादेखील पुण्यापर्यंत चालविण्यात येणार आहे. तर मुंबई पुणे इंद्रायणी एक्सप्रेस, पुणे-अहमदाबाद दुरांतो एक्सप्रेस, पुणे-एर्णाकुरम एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
बदलापूरहून सीएसटीच्या दिशेने येणाऱ्या लोकल सेवा धीम्यागतीने सुरु झाल्या आहेत. तर वांगणी स्टेशनदरम्यान पाणी साचल्याने कर्जतकडे जाणारी रेल्वे वाहतूक अद्यापही ठप्प आहे.