ठाणे : मंगळवारी जोरदार पुनरागमन केलेल्या पावसाने बुधवारीही आपला जोर कायम ठेवला. सकाळच्या सत्रात काहीशी उघडीप दिलेल्या पावसाने दुपारनंतर पुन्हा जोर धरला. मात्र, कुठेही फारसे नुकसान झाले नाही. या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांनी लावणीच्या कामांसाठी शेतांकडे धाव घेतली आहे. तर, पालघरमधील पूरस्थिती ओसरली असली तरीही सूर्या नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. दरम्यान, आगामी ४८ तासांत ठाण्यासह कोकणपट्टीमध्ये अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली असून किनारपट्टीला अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. सुमारे १५ दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या वरुणराजाने मंगळवारपासून चांगलाच जोर पकडला आहे. गेल्या २४ तासांत ठाणे जिल्ह्यात १०४.८९ मिमी इतका पाऊस झाला असून धरणामधील पाणीसाठा ७६.०२ टक्के इतका झाला आहे. मंगळवारी दिवसभर पडलेल्या पावसाने बुधवारी पहाटे साडेतीन वाजेपासून थोडीशी उघडीप दिली होती. मात्र, दुपारी १ वाजेपासून पावसाने पुन्हा आपली संततधार सुरू केली. ठाणे शहरातील घंटाळी येथे एक झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. बुधवारी दिवसभरात ठाण्यात ९८ मिमी, कल्याणात १०० मिमी, मुरबाडमध्ये १०६ मिमी, भिवंडीत १८० मिमी, शहापूर १५२ मिमी, उल्हासनगर ६१ मिमी, अंबरनाथ ३६.२० मिमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये ७३४.२० मिमी इतका पाऊस झाला असून गेल्या वर्षी याच सुमारास तो ७३९.५३ मिमी इतका होता. सर्वाधिक पाऊस हा ठाणे परिसरात झाला असून सर्वात कमी उल्हासनगर आणि अंबरनाथ तालुक्यांत झाला आहे.मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसांच्या पावसामुळे धरणांमधील पाण्याची पातळीदेखील उंचावण्यास मदत झाली असून भातसामध्ये १२.८४ टक्के तर मोडकसागरमध्ये २.५४ टक्के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. तानसा आणि बारवी धरणांमध्ये अनुक्र मे १.५७ आणि १.११ टक्के पाणीसाठा आहे. बिर्लागेट : गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे उल्हास नदीस पूर आला असून रायता-दहागाव रस्त्यावर झाड पडले आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास अनेक गावांचा संपर्क तुटू शकतो, अशी भीती आहे.गेल्या दोन ते तीन दिवसांत तालुक्यात ३०० मिमीच्या आसपास पाऊस पडला, तर आतापर्यंत ९५३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. कालच काळू नदीवरील रुंदा पूल पाण्याखाली गेल्याने १० ते २० गावांचा संपर्क तुटला होता. आज पडणाऱ्या संततधार पावसामुळे उल्हास नदीस पूर आला आहे. म्हारळ, रायता, कांबा येथील सखल भागात पाणी साचले होते. तर पाचरघोळ, पाचवामैल येथील गणेशघाट पाण्याखाली गेला होता. भिवंडी : ठाणे महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनच्या समांतर रस्त्यावरील धूळ खाडीचा लहान पूल तुटल्याने महानगरपालिकेच्या वाहतुकीस अडथळा निर्माण झाला तसेच सोनाळे-बापगाव दरम्यानच्या १५ गावांचा संपर्क तुटला. तालुक्यातील भातसा-पिसे धरणामधून पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन ठाणे महानगरपालिकेने टाकली असून या पाइपलाइनची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी स्वतंत्र रस्ता बनविला आहे. या रस्त्यावरून परिसरातील १५ गावांतील ग्रामस्थ दररोज शहरात येत होते. परंतु, दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसात या मार्गावरील धूळखाडीचे पाणी पुलावरून वाहत जाऊन त्या पाण्यात काल रात्रीदरम्यान पूल वाहून गेला. सोनाळे-बापगावदरम्यानचा हा पूल सन १९७० मध्ये ठाणे महानगरपालिकेने बांधला होता. काळू नदीला पूरटिटवाळा : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामुळे कल्याण तालुक्यातील काळू नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने टिटवाळा शहराशी असलेला १५ गावांचा संपर्क दोन दिवसांपासून तुटला आहे. दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे बळीराजा सुखावला असला तरी यामुळे भाजीवाले, दूधवाले, शाळा, कॉलेज विद्यार्थी तसेच चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. पाऊस असाच सुरू राहिल्यास पुलावरील पाणी ओसरणे कठीण आहे.
जिल्ह्यात पावसाची संततधार
By admin | Published: July 23, 2015 3:58 AM