ठाणे : ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागांत बुधवारी पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली. बुधवारी दुपारी पाच वाजेपर्यंत ठाण्यात७०.०९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. कोपरी येथील एका इमारतीच्या संरक्षक भिंतीवर वृक्ष उन्मळून पडल्याची घटना घडली. पाऊस आणि खड्ड्यांमुळे काही ठिकाणी वाहतुकीचा वेगही मंदावला होता. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी शहरांतही पावसाचा जोर वाढला होता.मागील आठवड्यात मुंबई, ठाण्याला झोडपणाऱ्या पावसाने सोमवारी, मंगळवारी काहीशी विश्रांती घेतली होती. अधूनमधून पावसाच्या सरी बरसत होत्या. मात्र, बुधवारी पहाटेपासून ठाण्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसामुळे कोपरी येथील बाराबंगला परिसरात एक झाड बंगल्याच्या संरक्षक भिंतीवर उन्मळून पडले. वर्तकनगर येथेही झाड पडून रवींद्र मोहिते यांच्या घराचे नुकसान झाले. वागळेच्या आयटीआय परिसरात एक वृक्ष कोसळला. येऊर येथे ओव्हरवायर पडल्याने सतीश मोरे यांच्या घरास हानी पोहचली.पावसामुळे घोडबंदर परिसरात वाहतुकीचा वेग मंदावला होता. घोडबंदर येथील कापूरबावडी, कासारवडवली येथे वाहतूककोंडी झाली होती. मुंबई-नाशिक महामार्गावरील माजिवडा परिसरातही पावसामुळे कोंडी झाली. त्यामुळे नाशिकच्या दिशेने जाणाºया वाहनचालकांना या कोंडीचा परिणाम जाणवला. भिवंडीत ७५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. दुपारी अवजड वाहनांमुळे वाहतूककोंडीत भर पडली. कल्याणमध्येही दुपारनंतर पावसाचा जोर वाढला होता.वाहनधारकांची गैरसोयकल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांची अवस्था मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अगोदरच बिकट झालेली असताना, मुसळधार पावसाची भर पडून शहरातील वाहतूक मंदावली होती. ठिकठिकाणी सखल भागांत पाणी साचल्याने यातून मार्ग काढताना वाहनधारकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. सदैव वर्दळीच्या असलेल्या कल्याण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांची प्रचंड गैरसोय झाली.कल्याण-डोंबिवलीत ठिकठिकाणी साचले पाणीलोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरांत मंगळवार रात्रीपासून बुधवारी दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे शहरांत ठिकठिकाणी सखल भागांत पाणी साचले होते. पावसामुळे सकाळी नोकरदारवर्गाची कामावर जाताना तारांबळ उडाली.रेल्वेस्थानक परिसरात रिक्षाचालक आणि दुचाकीस्वार पावसाच्या सरींपासून बचाव करण्यासाठी मार्ग काढताना दिसत होते. भाजीखरेदीसाठी आलेल्या गृहिणी आणि खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना एसटी, केडीएमटी बस तसेच रिक्षांच्या प्रतीक्षेत पावसातच उभे राहावे लागल्याने त्यांची गैरसोय झाली. दुसरीकडे पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांतून वाट काढताना वाहनचालकांना विशेषत: दुचाकीस्वारांना कसरत करावी लागत आहे.ठाकुर्लीत खड्ड्यांमुळे वाहतूककोंडीठाकुर्लीतील मारुती मंदिराजवळ खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावल्याने तेथे कोंडी झाली होती. दरम्यान, नगरसेवक राजेश मोरे यांच्या प्रभागात पक्ष कार्यालयानजीक पाणी साचले होते.
ठाणे जिल्ह्यात पावसाने लावली पुन्हा दमदार हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 12:56 AM