लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणो : राज्यातील जिल्ह्यात पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. मात्र, ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे ठिकठिकाणच्या रस्त्यांची चाळण झाली आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघात वाढत आड्त. अतिवृष्टी व पुराने तब्बल २२ कोटी ३२ लाख रुपये किमतीचे रस्ते वाहून गेले आहेत. यामध्ये ६८.६४५ किमीच्या इतर जिल्हा मार्गांसह (ओडीआर) गाव रस्त्यांचा (व्हीआर) समावेश आहे, असे नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे.
मुंबई महानगराला लागून असलेला ठाणो जिल्हा चार हजार ५०० चौ. किमीमध्ये विस्तारला आहे. मुंबई गाठण्यासाठी आणि मुंबई बाहेर पडण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील रस्ते महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. पण, या रस्त्यांवरील सततची वाहतूक, त्यात वाहनांची कोंडी आदींसह गावपाडे, खेड्यांना जोडणारे रस्ते जीवघेणे ठरत आहेत. यंदा आतापर्यंत एक हजार ४६७ मिमी. पाऊस पडला आहे. जवळजवळ ८५ टक्के पाऊस जिल्ह्यात पडला. यामुळे जिल्ह्यातील प्रमुख्य जिल्हा मार्गांसह जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील तीन हजार १०० किमी.च्या रस्त्यांपैकी बहुतांशी रस्त्यांची चाळण झाली आहे. तर अतिवृष्टीच्या कालावधीत ६९ किमी. रस्ते पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत.
जिल्हा परिषदेच्या नियंत्रणात सध्या ६४०.३९५ किमी.चे इतर जिल्हा मार्ग आहेत. तर गाव रस्ते दोन हजार १७६.७५ किमी.चे आहेत. या एकूण तीन हजार १०० किमी.च्या ६० किमी. रस्ते खराब होऊन वाहून गेले आहेत. तब्बल २२ कोटी ३२ लाख ५० हजार रुपये किमतीचे रस्ते वाहून गेल्याचा फटका जिल्हा परिषदेला बसला आहे. आता नव्या दरानुसार त्यासाठी २६ कोटी १३ लाख रुपये खर्च करून या रस्त्यांना दुरुस्त करावे लागणार आहे. या निधीसाठी आता जिल्हा परिषदेकडून एनडीआरएफच्या निधीसाठी प्रयत्न करण्यात येत आहे. तो प्राप्त झाल्यानंतरच जिल्ह्यातील या गावखेड्य़ाच्या रस्त्यांची दुरुस्ती होणार आहे.
सर्वाधिक रस्त्यांची समस्या कल्याण तालुक्यात
जिल्ह्यात सर्वाधिक रस्त्यांची समस्या कल्याण तालुक्याला भेडसावत आहे. या तालुक्यातील २१ किमीच्या एक कोटी ८० लाख रुपये किमतीच्या रस्त्यांचा फटका जिल्हा परिषदेला बसला आहे. या रस्त्यांसाठी आता दोन कोटी ५० लाखांच्या निधीची गरज आहे. या खालोखाल भिवंडीच्या १८.७३ किमी.च्या रस्त्यांचा समावेश आहे. सात कोटी ९० लाख किमतीच्या या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पाच कोटी ९० लाखांची मागणी आहे. शहापूर तालुक्यामधील १६.३० किमीचा आठ कोटी ९१ लाख किमतीच्या रस्त्याचा फटका बसला आहे. आता या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी १३ कोटी ८६ लाखांची मागणी होत आहे. मुरबाड तालुक्यातही १२.६१ किमीच्या रस्त्यांना फटका बसला आहे. या तीन कोटी ७१ लाख किमतीच्या रस्त्यांसाठी तीन कोटी ८७ लाखांच्या निधीची गरज आता जिल्हा परिषदेला आहे. या निधीच्या प्राप्तीनंतर जिल्ह्यातील हे रस्ते नव्या रूपात पाहायला मिळणार आहेत.
....