मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयात पोलीस शिपाई पदांच्या भरतीच्या अनुषंगाने बुधवारी १९ जून रोजीची मैदानी चाचणी पावसा मुळे पुढे ढकलावी लागली . आता ही चाचणी २६ जून रोजी होणार आहे . तर गुरुवार पासून २५ जून पर्यंतच्या तारखा दिलेल्या विद्यार्थ्यांची मैदानी चाचणी देखील पावसावर अवलंबून राहणार आहे .
मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर सन २०२२-२३ मध्ये पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारी २३१ पदे भरण्याकरीता पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात आली आहे. ह्या रिक्त २३१ पदाकरीता १५२३ महिला तसेच ६९०० पुरुष असे एकुण ८४२३ अर्ज आले आहेत .
सदर पोलीस शिपाई भरतीसाठीची मैदानी चाचणी दिनांक १९ व २५ जून या दरम्यान भाईंदर पश्चिमेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान या ठिकाणी घेण्यात येणार होती . त्यानुसार प्रति दिवस साधारण ५५० उमेदवारांची चाचणी घेण्याचे वेळापत्रक आखण्यात आले आहे. मैदानी चाचणीमध्ये पुरुषांकरीता १६०० मी. धावणे, १०० मी. धावणे व गोळाफेक तसेच महिलांकरीता ८०० मी. धावणे, १०० मी. धावणे व गोळाफेक चाचण्या घेतल्या जाणार आहेत .
मात्र आज बुधवारी मैदानी चाचणीच्या पहिल्याच दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने चाचणीसाठी उमेदवार काहीसे कमी आले . शिवाय पावसा मुळे केवळ छाती आणि उंची चे मोजमाप घेण्यात आले . आज मैदानी चाचणी न झालेल्या उमेदवारांना आता २६ जून रोजी बोलावण्यात आले आहे . मैदानावर चिखल झालेल्या ठिकाणी वाळू व लाकडी भुसा टाकण्यात आला आहे . पावसामुळे मैदानात चिखल होऊ नये यासाठी मैदान ताडपत्रीने झाकून ठेवले गेले आहे . शिवाय मंडप उभारण्यात आला आहे . जेणे करून उमेदवारांची बायोमेट्रिक तपासणी व नोंद तसेच मंडपातील चाचण्या घेता येणे शक्य होईल . तसेच मंडपामुळे भरतीसाठी येणारे उमेदवार पावसात भिजणार नाहीत . १०० मिटर रनिंग व गोळा फेक होणार आहे तर १६०० मिटर धावणे हि चाचणी बाजूला बनलेल्या नवीन सिमेंट रस्त्यावर घेतली जाणार आहे . पावसामुळे आज अनेक उमेदवार भिजले होते .
दरम्यान पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी व पैशांचा गैरवापर होऊ नये ह्यावर विशेष लक्ष दिले जात आहे . त्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या गेल्या आहेत . रेडीओ फ्रीक्वेन्सी आयडेंटिफिकेशन तंत्र चा वापर करण्याचे शासन आदेश असून त्याची अमलबजावणी केली जात आहे . पावसाच्या अनुषंगाने तयारी करण्यात आली असून उद्यापासून किंवा परवा पासून मैदानी चाचणी पुन्हा सुरू केली जाईल असे अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी म्हटले आहे .