- अनिकेत घमंडी
डोंबिवली : शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली असून वातावरणात गारवा पसरला आहे. महिनाभरापासून पावसाच्या तुरळक सरी पडल्या होत्या, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची चिंता वाढली होती, पण मंगळवारच्या पावसामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. तसेच जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे बारवी धरणाची पाण्याची पातळी कमी झाली असून ते देखील चिंतेचे आहे. त्यामुळे पावसाची नितांत आवश्यकता आहे. पहाटेपासूनच पावसाच्या जोरदार सरींनी अत्यावश्यक सेवेतील चाकरमान्यांचे नियोजन सपशेल कोलमडले.
मुंबईतील सायन भागात पाणी साचल्याची माहिती मिळल्याने काहींनी लोकल प्रवास करणे टाळले, तर काहींनी मुंबईत जाऊन अडकण्यापेक्षा शहरात राहणे पसंत केले. रक्षणधनला देखील बाजारपेठेत उत्साह नव्हता, त्यात मंगळवारच्या पावसामुळे देखील व्यापाऱ्यांच्या अपेक्षावर पाणी फिरवले गेले. सकाळी जोरदार पावसाच्या सरीत अनेकांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
शहरातील इंदिरा गांधी चौकात तुलनेने कमी गर्दी होती. वातावरण ढगाळ असल्याने आणि मोठी भरती असल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी गरज असेल तरच रेल्वे प्रवास करून मुंबई गाठण्याचा मानस ठेवला. रस्त्यावर नागरिकांची तुरळक गर्दी होती. रिक्षा देखील कमी प्रमाणात रस्त्यावर होत्या. शहरातील चिमणी गल्ली, फडके पथ, बाजी प्रभू चौक, नेहरू मैदान परिसरात भाजी विक्रेत्यांची देखील गैरसोय झाली होती. बाजारात ग्राहक कमी आल्याने त्यांच्या व्यवसायावर परिणाम।झाला होता.
- पहाटेच्या वेळेत पावसाच्या जोरदार सरी व सोसाट्याचा वारा यामुळे शहराला झोडपून काढले होते. अनेकांच्या बाल्कनीमध्ये वाऱ्यामुळे पावसाचे पाणी आले. त्यामुळे पहाटेपासून नागरिकांना पावसाचा अंदाज आला असल्याने त्यानुसार काहींनी नियोजन केले. पण अखेरीस पाऊस सकाळच्या सत्रात न थांबल्याने त्या नियोजनावर पाणी फिरवले गेले.