ठाणे : सलग तीन दिवस सुरू असलेल्या पावसाचा जोर बुधवारी काही प्रमाणात कायम होता. २४ तासांत ठाणे शहरात ३४.७८ मिमी, तर बुधवारी दिवसभरात ६२.७३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाने झाडे, भिंती, आग आणि पाणी तुंबण्याच्या प्रामुख्याने घटना घडल्या आहेत. यामध्ये जवळपास ११ गाड्यांचे नुकसान झाले आहे. एका घरावर वृक्ष पडल्याने घराचे पूर्णत: नुकसान झाले. शहरातील सखल भागात सकाळच्या सत्रात पाणी साचले होते.
शनिवारी रात्रीपासून पावसाने चांगला जोर धरला होता. बुधवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी दिवसभर अंधार होता. सूर्याचे दर्शनही झाले नाही. बुधवारीदेखील दिवसभर पावसाने शहरात बऱ्यापैकी हजेरी लावली. शहराच्या सखल भागांत पाणी साचले होते. पाणी तुंबण्याच्या दोन तक्रारी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे नोंदविण्यात आल्या आहेत. यामध्ये लवकुश सोसायटी चेकनाका आणि गावदेवी मार्केट नौपाडा येथे पाणी साचले होते. ठाणे पोलीस आयुक्तालयाजवळील गुन्हे अन्वेषण विभागाच्या आवारातदेखील पाणी साचले होते. शहरात १५ ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये ११ गाड्यांचे नुकसान झाले. बाळकुम पाडा १ येथील राम मारुतीनगर भागात वृक्ष पडल्याने घराचे नुकसान झाले. सुदैवाने यात जीवितहानी झाली. शहरातील तीन ठिकाणी झाडाच्या फांद्या पडल्या होत्या. शहरातील कचराळी तलाव, तलावपाळी, पार्किंग प्लाझा माजिवडा, गावंड भाग या ठिकाणी चार वृक्ष धोकादायक स्थितीत आले आहेत.