ठाणो : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्यातील सर्व धबधबे, धरणे, तलाव, गडकोट-किल्ले अशा पर्यटनस्थळी एकत्र येण्यास मनाई आदेश जारी केला आहे. त्यामुळे यंदाही ठाणेकरांना जिल्ह्यातील पावसाळ्यात त्यांच्याजवळच्या पर्यटनस्थळी आनंद घेता येणार नसल्याचे उघड झाले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर काही अंशी कमी होत आहे. त्यास अनुसरून सध्याच्या संचारबंदीतील निर्बंधही शिथिल केले आहेत. याचा गैरफायदा घेऊन पर्यटकांची धबधबे, तलाव, गडकिल्ले, माळशेज घाटासारख्या पर्यटनस्थळी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी हा मनाई आदेश जारी केला आहे. सार्वजनिक व खासगी जागेत एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे, कार्यक्रमांचे आयोजन करणे इत्यादींमुळे या कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्याने तत्काळ प्रतिबंधक उपाययोजना म्हणून ही मनाई केली आहे.
जिल्ह्यात मान्सून कालावधीत मोठ्या संख्येने पर्यटक धबधबे, तलाव तसेच धरणांच्या ठिकाणी येत असल्याचा आजवरचा अनुभव आहे. त्या ठिकाणी जीवितहानी होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे धबधबे, तलाव किंवा धरणांच्या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात अशा ठिकाणी सामाजिक अंतर पाळणे शक्य होणार नाही. परिणामी, कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन प्रसार होण्याची दाट शक्यता आहे. यावर मात करण्यासह पर्यटकांची सुरक्षा अबाधित राहावी व कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
....
- ही आहेत जिल्ह्यातील पर्यटनस्थळे
* ठाणे तालुक्यातील येऊर धबधबे, सर्व तलाव, कळवा-मुंब्रा रेती बंदर, मुंब्रा बायपास येथील सर्व धबधबे, गायमुख रेतीबंदर, घोडबंदर रेतीबंदर, उत्तन सागरी किनारा आदी पर्यटनस्थळी यंदाही मनाई आहे.
* मुरबाड तालुक्यात सिद्धगड डोंगरनाव्हे, सोनाळे गणपती लेणी, हरिश्चंद्रगड, बारवी धरण परिसर, पडाळे डॅम, माळशेज घाटातील सर्व धबधबे, पळू, खोपवली, गोरखगड, सिंगापूर नानेघाट, धसई डॅम, आंबेटेंबे ही स्थळे आहेत.
* शहापूर तालुक्यात भातसा धरण, कुंडन दहीगाव, माहुली किल्ल्याचा पायथा, चेरवली, अशोका धबधबा, खरोड, आजा पर्वत (डोळखांब) सापगाव नदीकिनारी, कळंबे नदीकिनारा, कसारा येथील सर्व धबधबे ही स्थळे आहेत.
* कल्याण तालुक्यातील कांबा पावशेपाडा, खडवली नदी परिसर, टिटवाळा नदी परिसर,गणेश घाट चौपाटी ही स्थळे आहेत.
* भिवंडी तालुक्यातील नदीनाका, गणोशपुरी नदी परिसर ही स्थळे आहेत.
* अंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्वर, धामणवाडी, तारवाडी, भोज, वर्हाडे, दहिवली, मळीचीवाडी आदी स्थळे.
.......