ठाणे : गणेशोत्सव मंडळे गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ठाण्यातदेखील गणेशोत्सवातील जाहिरातबंदी उठवावी, अशी मागणी ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आहे. कोरोनाचे सावट अद्याप पूर्णपणे गेले नसल्याने गणेशोत्सव मंडळे यंदाही आर्थिक अडचणीत आहेत. राज्य सरकारने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी गेल्यावर्षीच्या अटी लागू केल्या आहेत. कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती खालावली असल्याने मंडळांना लोकवर्गणी मिळणार की नाही हा एक प्रश्न आहे. वर्गणीअभावी हा उत्सव साजरा करावा लागण्याची शक्यता आहे. स्वेच्छेने वर्गणी आल्यास ती स्वीकारली जाईल पण सध्याची परिस्थिती पाहता लोकवर्गणी मागणार नसल्याची भूमिका ठाण्यातील बहुतांशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतली आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या नियमावलीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना जाहिरातबाजी करण्यास परवानगी दिलेली नाही. मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी ही बंदी उठवावी ही मंडळांची मागणी मुंबई महापालिकेने मान्य करून जाहिरातबाजीस परवानगी दिली. त्याच धर्तीवर ठाणे शहरातदेखील असा निर्णय व्हावा अशी मागणी ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने मंगळवारी महापौरांना केली आहे. यामुळे मंडळाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास सहकार्य मिळेल, असा आशावाद समितीचे अध्यक्ष समीर सावंत यांनी व्यक्त केला.