अंबरनाथ: अंबरनाथमधील मनसेमध्ये जे दोन गट तयार झाले होते ते दोन्ही गट एकमेकांकडे पाठ करूनच संघटनात्मक काम करीत होते. याबाबतची तक्रार राज ठाकरे यांच्या कानावर येतच त्यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांना डोंबिवलीमध्ये बोलवित त्यांची चांगलीच खराटपट्टी काढली. एवढेच नव्हे तर महिन्याभरात रिझल्ट न दिल्यास आणि गटबाजी न संपवल्यास या सर्व पदाधिकाऱ्यांना घरी बसवण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले. राज ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी गटबाजी बाजूला ठेवत एकत्रित काम करण्याचे आश्वासन राज ठाकरेंना दिले. त्यानंतर राज ठाकरे यांनी स्वतः मोबाईल हातात घेत गटबाजीत सामील असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून एकत्रित उभे केले आणि स्वतः फोटो काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला.
राज ठाकरे अंबरनाथ आणि बदलापूरच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी बदलापूरची कार्यकारणी थेट बरखास्त करण्याचे आदेश दिले होते. तत्पूर्वी अंबरनाथची कार्यकारणी देखील गटबाजीमुळे बरखास्त होईल अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र आमदार राजू पाटील यांच्या मध्यस्थीमुळे गटबाजी असताना देखील कार्यकारणी बरखास्त झाली नाही. मात्र गटबाजी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना थेट राज ठाकरे यांनी बैठकीसाठी डोंबिवलीत बोलावले होते. यावेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के, स्वप्नील बागुल आणि त्यांचे पदाधिकारी एका बाजूला तर दुसरीकडे अंबरनाथ शहराध्यक्ष कुणाल भोईर आणि जिल्हा संघटक संदीप लकडे असे दोन प्रभावी गट अंबरनाथमध्ये तयार झाले होते. राज ठाकरे यांच्या दौऱ्या दरम्यान देखील बॅनरबाजी करताना या दोन्ही गटाचे बॅनर्स स्वतंत्र लावण्यात आले होते. या प्रकरणी राज ठाकरे यांनी देखील गंभीर दखल घेत या दोन्ही गटांना बैठकीसाठी डोंबिवलीत बोलवले होते.
गटबाजी असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी खडेबोल सुनावत गटबाजीत करणारा असाल तर महिन्याभरात कार्यकारिणी बरखास्त करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मात्र यावेळी पदाधिकाऱ्यांनी आम्ही गटबाजी करणार नाही याची शाश्वती दिल्यानंतर राज ठाकरे यांनी सबुरीने घेत या सर्व गटबाजी करणाऱ्यांना एकत्रित आणले. एवढेच नव्हे तर कट्टर विरोधक असलेल्यांना एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवण्यास सांगत स्वतः राज ठाकरे यांनी त्यांचा फोटो काढला. अंबरनाथची गटबाजी संपवण्यासाठी राज ठाकरे यांनी फोटो काढण्याचा घेतलेला हा अनोखा मार्ग गटबाजी करणाऱ्यांना किती दिवस एकत्रित ठेवते हे येणारा कळच ठरवेल.