ही पहिली निवडणूक मी बघतोय, ज्या लोकसभेच्या निवडणुकीला विषयच नाहीय. कोणताही विषय नसल्याने सर्वजण आई-बहिणींवरून एकमेकांचा उद्धार करत आहेत. खरे तर लोकांच्या जीवन मरणाचे रोजचे जे विषय आहेत ते विषय यायला हवेत. काय निवडणूक सुरू आहे? कशावर निवडणूक सुरू आहे? वडील चोरले... फोडाफोडीचं राजकारण मला कधी मान्य झालं नाही. कधी होणारही नाही. पण आज जे बोलत आहेत, आमचा पक्ष फोडला, आमपचा पक्ष फोडला. तुम्ही जे सर्व एकत्र बसला आहात, कोणत्या तरी आघाडीत, जरा एकमेकांकडे एकदा बघा, आपण काय उद्योग केले आहेत? अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर एकाच वेळी हल्ला चढवला. ते ठाण्यात श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.
याच उद्धव ठाकरेंनी मनसेचे सात पैकी सहा नगर सेवक फोडले होते ना? - फोडाफोडीच्या राजकारणावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, "याच उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सात पैकी सहा नगर सेवक खोके, खोके देऊन तुम्ही फोडले होते ना? तेव्हा काही नाही वाटलं? आहो मागीतले असते तर दिले असते. पण काय आहे, त्याला म्हणतात ना ढेकनासंगे हीराही भंगला... बरोबर शरद पवार बसले आहेत."
फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात महाराष्ट्रात शरद पवारांनी केली - "या फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात महाराष्ट्रात कुणी केली असेल, तर ती शरद पवारांनी केली. त्यांनी पहिल्यांदा काँग्रेस फोडली. मग पुलोद स्थापन केलं. महाराष्ट्रात पहिलं फोडाफोडीचं राजकारण शरद पवारांनी सुरू केलं. मग 1991 पुन्हा याच शरद पवारांनी छगण भुजबळांना फितवून बाळासाहेबांची शिवसेने फाडायला लावली. तेव्हा शिवसेनेचे आमदार फोडायचं काम याच शरद पवारांनी केलं होतं. ज्या छगन भुजबळांना फोडलं आज ते इथे असतील. मी आपलं काय माझा बाहेरून पाठींबा आहे. त्यामुळे मी काही बोलू शकतो. आपल्याला कुठे आजून फेविकॉल लागला आहे?" असेही राज म्हणाले.
"यानंतर, नारायण राव राणे यांच्या बरोबर आमदार घेऊन त्यावेळी काँग्रेसने पुन्हा बाळासाहेबांची शिवसेने फोडली. मला आजचं नेतृत्व तेव्हा टाहो फोडताना दिसलं नव्हतं," असेही राज ठाकरे म्हणाले.