Raj Thackeray Meets Kalpita Pimple: ठाणे महानगरपालिका क्षेत्रात फेरीवाल्यानं केलल्या जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेल्या महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात जाऊन भेट घेतली. राज ठाकरे यांनी कल्पिता पिंपळे यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि पक्षाकडून फेरीवाल्यांबाबत योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं. त्यानंतर राज ठाकरे यांनी ठाण्याच्या पोलीस उपायुक्तांशीही चर्चा करुन संपूर्ण घटनेची माहिती घेतली आहे.
'तो' फेरीवाला जेलमधून बाहेर निघताच चोपणार, भीती काय असते दाखवून देऊ: राज ठाकरे
ठाणे महापालिका क्षेत्रात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करताना एका फेरीवाल्यानं ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. फेरीवाल्यानं कोयत्यानं केलेल्या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांची दोन बोटं तुटली आणि त्यांच्या डोक्यालाही दुखापत झाली आहे. कल्पिता पिंपळे सध्या ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल असून नुकतीच त्यांच्या बोटांवर यशस्वी शस्त्रक्रीया देखील झाली आहे.
राज ठाकरे यांनी याआधीच कृष्णकुंजवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याबाबत संताप व्यक्त केला होता. कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला केलेला फेरीवाला पोलिसांच्या तावडीतून सुटला की मनसैनिक त्याला चोप देतील असं रोखठोक विधान राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यानंतर आज राज ठाकरे कल्पिता पिंपळे यांच्या भेटीसाठी ठाण्यात पोहोचले होते.