ठाणे – मुंब्राची म्हैस, जितेंद्र आव्हाड आम्हाला सांगतात दंगल भडकवू नका. तू आम्हाला शिकवणार? तुम्ही काय काय धंदे केलेत. इशरत जहांला पाठिंबा देणारे तुम्ही, अफजल गुरूला फाशी देऊ नका म्हणून रडणारे तुम्ही. आम्ही सगळे प्रभू श्री रामचंद्रांचे सैनिक आहोत. आमच्या शेपटीला आग लावाल तर तुमची लंका जाळल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी देत समोरासमोर या, भ्याड लोकं रात्रीच्या अंधारात काय येता? महाराष्ट्र सैनिकांना आव्हान देऊ नका असं आव्हान दिले आहे.
संदीप देशपांडे म्हणाले की, २ एप्रिलला गुढी पाडव्याला शिवतीर्थावर न भूतो न भविष्य अशी राज ठाकरेंची सभा झाली. या सभेवर महाराष्ट्राचं लक्ष होतं. या सभेत प्रखर आणि परखड विचार राज ठाकरेंनी मांडले. त्यामुळे बरेच लोकं घायाळ झाले. ज्यांना इतिहास माहिती नाही ते पुण्याईवर जगणारे लोकं बोलायला लागले. शिवसेनेचा इतिहास तपासून घ्या. याच शिवसेनेला वसंत सेना म्हटलं जायचं. आता शरद सेना असा प्रवास झालाय. त्यांनी आमच्याबाबत बोलू नये. शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीची बी टीम आहे. डोळा एकाला मारला, प्रेम एकावर केलं, लग्न एकासोबत केले आणि हनीमून चौथ्यासोबत केले. तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताय. राज ठाकरेंनी जी भूमिका घेतली ती ठामच घेतली आहे असा टोला आदित्य ठाकरेंना लगावला आहे.
तसेच निवडणुकीपूर्वी युती एकाची आणि निकालानंतर दुसऱ्याच्या मांडीवर जाऊन बसला हा इतिहास तुमचा आहे. शिवसेना ढ टीम आहे. रामनवमीदिवशी रामरथ मनसेने तयार केला. गडकरी चौकात रामरथाचं पूजन केले. उद्धाटन केले. त्यानंतर हा रामरथ सगळीकडे फिरणार होता. तर आमच्या मनसेच्या विभाग अध्यक्षांपासून कार्यकर्त्यांना अटक केली. पोलीस सांगतात शिवसेनेला डिवचण्यासाठी तुम्ही हनुमान चालीसा लावली. हनुमान चालीसा लावल्यामुळे शिवसेना कधीपासून डिवचायला लागली? हे खरे असेल भगवा रंग शिवसेनेने बाजूला ठेवावा. मनसे संपली नाही तर बाळासाहेबांचे विचार तुम्ही संपवायला निघाले आहेत असा आरोपही मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला लगावला.