लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: माझे वडील चोरले असा आरडाओरडा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत; पण त्यांचे वडिलांवर प्रेम असते तर बाळासाहेब ठाकरे यांच्यावर वृद्धत्वामुळे शेलक्या शब्दांत टीका करणाऱ्या सुषमा अंधारे यांची त्यांनी प्रवक्तेपदी नियुक्ती केली नसती, तर बाळासाहेबांना तुरुंगात डांबणाऱ्या छगन भुजबळ यांच्यासोबत मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसले नसते, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी त्यांचा समाचार घेतला.
कळवा येथील ९० फूट रस्त्यावर राज यांची रविवारी सायंकाळी ठाणे लोकसभेतील शिंदे सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के, तर कल्याण लोकसभेतील उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी सभा झाली. तत्पूर्वी राज यांनी ठाण्यातील आनंद आश्रम येथे जाऊन स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
राज म्हणाले की, मागील निवडणुकीत मी एकदा काय तो ‘लाव रे तो व्हिडीओ’ बोललो तर माझ्यावर त्याचमुळे टीका होते. मात्र, आज मी तुम्हाला एक व्हिडीओ दाखवणार आहे असे म्हणून त्यांनी अंधारे यांचा एक जुना व्हिडीओ लावला. त्यामध्ये त्यांनी ८५ वर्षांचे बाळासाहेब यांच्या हातामधील तलवार लटलटत असल्याची टीका केली होती. तो व्हिडीओ दाखवून राज म्हणाले की, बाळासाहेबांबाबत अशी वक्तव्ये करणाऱ्या बाई शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून उद्धव ठाकरे नियुक्त करतात. ज्या छगन भुजबळ यांनी बाळासाहेबांना अटक केली त्यांच्यासोबत महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात ते बसतात. वर आपले वडिलांवर प्रेम असल्याचा दावा करतात, हे पटणारे नाही.
शिवसेना फोडली म्हणून उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट असल्याचे जे बोलले जाते त्याचा समाचार घेताना राज म्हणाले की, मुंबई महापालिकेत मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी सहा नगरसेवक हे याच उद्धव ठाकरे यांनी खोके देऊन फोडले. तेव्हा त्यांना त्याबद्दल काही वाटले नाही. मनसेने पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली असती तर आम्ही स्वतःहून तो दिला असता. पण ढेकणासंगे हिराही भंगला अशी उद्धव यांची अवस्था असल्याचे ते म्हणाले.
...तर आमची बाजू नेहमीच बाहेरची
श्रीकांत शिंदे यांनी मनसे आणि शिंदेसेना हा फेविकॉल का जोड आहे, असे वक्तव्य केले होते. त्याचा उल्लेख करून राज म्हणाले की, फेविकॉलचा हा जोड पुढच्या वेळी आतून लावा. नाही तर आमची बाजू नेहमीच बाहेरची राहील. त्याचबरोबर महायुतीला खडे बोल सुनावताना आमचा बाहेरून पाठिंबा आहे. आम्हाला अजून कुठे फेविकॉल लागले, असा चिमटा राज ठाकरे यांनी काढला.