ठाणे : अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलन व हास्यदर्शन प्रदर्शन शनिवार २० व रविवार २१ जानेवारी रोजी ठाण्यात रंगणार आहे. या संमेलनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे व्यंगचित्रकार म्हणून उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच महिलांसाठी व्यंगचित्र कार्यशाळा होत आहे.ज्ञानराज सभागृह आणि कचराळी तलाव या दोन ठिकाणी संमेलनाचे कार्यक्रम होणार आहेत. शनिवार २० जानेवारी रोजी ज्ञानराज सभागृह येथे सकाळी १०.३० वा. व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर, व्यंगचित्रकारांच्या ओळखी, भेटी व परिचय हा कार्यक्रम होणार आहे. दुपारच्या सत्रात महिलांसाठी व्यंगचित्र कार्यशाळा होणार असून, वैजनाथ दुलंगे व राधा गावडे हे मार्गदर्शन करणार आहेत. कचराळी तलाव येथे अरविंद गाडेकर, सुरेश क्षीरसागर, वैजनाथ दुलंगे, विवेक प्रभुकेळुस्कर, संजय मोरे, उमेश चारोळे, भटू बगाले, विनय चणेकर आदींच्या व्यंगचित्रकारांची प्रात्यक्षिके पाहायला मिळणार आहेत. सायंकाळी विवेक मेहेत्रे यांचा ‘हास्यकॉर्नर एक झलक’ हा कार्यक्रम होणार आहे. ‘सोशल मीडिया व व्यंगचित्रे’ या परिसंवादात चित्रकार विजयराज बोधणकर, व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी, चारुहास पंडित, महेंद्र भावसार, गणेश जोशी सहभागी होणार आहेत. रात्री ज्ञानराज सभागृहात मनोरंजनाचा कार्यक्रम निमंत्रितांसाठी होणार आहे, तसेच दोन्ही संमेलनस्थळी ‘तुमचे व्यंगचित्र तुमच्यासमोर’ उपक्रम सुरू राहील, असे आयोजकांनी सांगितले.रविवार, २१ जानेवारी रोजी सकाळी कचराळी तलाव येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी व्यंगचित्र कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यात वैजनाथ दुलंगे, विवेक प्रभुकेळुस्कर मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी सर्व वयोगटांसाठी व्यंगचित्र कार्यशाळा ज्ञानराज सभागृह येथे होणार आहे. सायंकाळी ‘आमच्यासारखे आम्हीच’ ही स्पर्धा ‘ज्ञानराज’मध्येच होणार असून, सायं. ६.३० ते ६.४५ दरम्यान अध्यक्षीय भाषण होणार आहे.त्यानंतर, जीवनगौरव प्रदान समारंभ/विनोदी दिवाळी अंकांच्या संपादकांचे सत्कार होणार आहेत. सायंकाळी ‘मराठी दैनिकांचे संपादक राजकीय व्यंगचित्रापासून दूर का?’ या विषयावर होणाºया परिसंवादात बाबू गंजेवार, विवेक मेहेत्रे, पंढरीनाथ सावंत, कुमार कदम, ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर सहभागी होणार असून, त्यानंतर संमेलनाचा समारोप होणार आहे.या संमेलनाची चोख व्यवस्था ठेवण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे़ राज ठाकरे येणार असल्याने येथे अधिकच गर्दी होण्याची शक्यता आहे़
ठाण्यात व्यंगचित्रकार संमेलन, राज ठाकरे उपस्थित राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 2:25 AM