कल्याण : केंद्रासह राज्य सरकार आणि करातून गेल्या १५ वर्षांत महापालिकेला मिळालेले १५ हजार कोटी गेले कुठे, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी शिवसेना-भाजपाला केला.येथील पश्चिमेतील खडकपाडा, साई चौकात बुधवारी त्यांची महापालिका निवडणुकीची प्रचार सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते.कल्याण-डोंबिवली शहरांचा शिवसेना-भाजपाने योग्य प्रकारे विकास केला असता तर या निवडणुकीत बाळासाहेबांच्या नावावर मते मागण्याची वेळ आली नसती, असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला. या वेळी त्यांनी नाशिकमध्ये केलेल्या आणि सुरू असलेल्या विकासकामांचे प्रेझेंटेशन चित्रफितीच्या माध्यमातून सादर केले. एकहाती सत्ता द्या. नाशिकसारखा विकास कल्याण-डोंबिवलीचादेखील करून दाखवितो, अशी ग्वाही दिली.नाशिकमधल्या कामांबाबत मला विचारणा केली जात होती. परंतु, ही कामे दिसायला लागल्यावर कोणाची आता हिम्मत होत नाही. आज काही जण गेल्या जाहीरनाम्यातील गोष्टी वाचून दाखवित आहेत. गेली २० वर्षे त्यांच्या हातात सत्ता होती. परंतु, प्रगती करण्याऐवजी त्यांनी शहरांची वाटच लावली. विकासकामांमधून फक्त पैसे खाल्ले. सेना-भाजप महापालिकेच्या सत्तेत एकत्र होते. आता त्यांच्यात नळावरची भांडणे सुरू आहेत. लोकांना मूर्ख समजू नका. हा खेळ फार दिवस चालणार नाही. कल्याण-डोंबिवलीचे होत्याचे नव्हते करून ठेवले असून आता त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. सत्तेशिवाय विकास साधता येत नाही. माझ्याकडे इच्छाशक्ती असून त्यातून या शहरांचा मी चांगला विकास करू शकतो, असे ते म्हणाले. १९२५ ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. मात्र, भाजपाला सत्तेवर यायला २०१४ पर्यंत वाट पाहावी लागली. त्यामुळे निराश होऊ नका. जोमाने कामाला लागा. लोकांशी प्रतारणा करू नका, असा सल्लाही त्यांनी या वेळी कार्यकर्त्यांना दिला. (प्रतिनिधी)
महापालिकेला मिळालेले १५ हजार कोटी गेले कुठे : राज ठाकरेंचा सेना-भाजपाला सवाल
By admin | Published: October 28, 2015 11:17 PM