कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील फेरीवाल्यांविरोधात नागरिकांना तक्रार करता यावी, यासाठी स्वतंत्र व्हॉट्सअॅप नंबर जाहीर करण्याची मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांच्याकडे केली. या वेळी वेलरासू यांनी त्यांची मागणी मान्य करताना लवकरच नंबर जाहीर केला जाईल, असे आश्वासन दिले.मनसे नगरसेवकांच्या प्रभागात विकासकामे होत नसल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष ठाकरे यांनी शनिवारी वेलरासू यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. या प्रसंगी मनसेचे बाळा नांदगावकर, शिरीष पारकर, नितीन सरदेसाई, राजू पाटील, राजेश कदम, मनोज घरत, कौस्तुभ देसाई, विरोधी पक्षनेते मंदार हळबे, गटनेते प्रकाश भोईर, नगरसेविका कस्तुरी देसाई, तृप्ती भोईर आदी पदाधिकारी उपस्थित होते. मध्य रेल्वे आणि महापालिकेने त्यांच्या हद्दीतील फेरीवाल्यांविरोधात ठरवून कारवाई करावी, अशी मागणी करणारे पत्र ठाकरे यांनी वेलरासू यांना दिले. या वेळी मध्य रेल्वेचे पत्र मिळाले असल्याचे वेलरासू यांनी स्पष्ट केले. महापालिका हद्दीतील कारवाई अधिक गतिमान करा, अशी सूचना ठाकरे यांनी केली. या वेळी फेरीवालाविरोधी पथकातील कामगार व अधिकाºयांच्या बदल्या करा. कारवाईनंतर फेरीवाले पुन्हा येऊन बसतात. अधिकारीवर्ग फेरीवाल्यांकडून हप्ते घेतो, असे आरोप पदाधिकाºयांनी या वेळी केले. फेरीवाल्यांविरोधातील दंडाची रक्कम वाढवा. त्यामुळे त्यांना जरब बसेल. मुंबई महापालिकेच्या धर्तीवर दंड वाढवून कारवाई करा, अशी सूचना केली. फेरीवाल्यांविरोधात वारंवार कारवाई केली जाते, असे आयुक्तांनी सांगितले. फेरीवाल्यांविरोधात तक्रार तसेच त्यांचे फोटो काढून नागरिकांना पाठवता यावेत, यासाठी व्हॉट्सअॅप नंबर जाहीर करा, त्याची मोक्याच्या ठिकाणी जाहिरात करा, अशी सूचना ठाकरे यांनी केली. ही सूचना वेलरासू यांनी मान्य करून तातडीने अंमलबजावणीचे आश्वासन दिले.केडीएमसीतील २७ गावांच्या समावेशामुळे पालिकेची हद्द वाढली. मात्र, हद्दवाढीचे अनुदान सरकारने अजूनही दिलेले नाही. त्याविषयी काय केले, असा सवाल ठाकरे यांनी करताच सरकारदरबारी त्याचा पाठपुरावा सुरू आहे, असे वेलरासू म्हणाले. त्याबाबतचे पत्र ठाकरे यांना देण्याचे त्यांनी मान्य केले. २७ गावांत राज्य सरकारने अमृत योजनेंतर्गत १८० कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. त्यात ५० टक्के रक्कम सरकार व ५० टक्के रक्कम महापालिकेची आहे. या हिश्श्यानुसार महापालिकेस ९० कोटी निधी मिळणार नाही. त्यामध्ये देखभाल-दुरुस्तीचा अंतर्भाव आहे. महापालिकेस ५० कोटींचा निधी मिळणार आहे. ही योजना हद्दवाढ अनुदानात दिली गेली असती, तर महापालिकेस ९० कोटींचा निधी मिळाला असता. हा मुद्दा विरोधी पक्षनेते हळबे यांनी उपस्थित केला. या प्रकरणीही लक्ष घालण्याचे आयुक्तांनी मान्य केले आहे.नगरसेविका देसाई यांनी त्यांच्या प्रभागातील सफाई कामगार कामावर न येताच हजेरी लावतात, अशी तक्रार केली. त्यावर वेलरासू यांनी संबंधित कर्मचाºयांची नावे मागितली आहेत. नगरसेविका भोईर यांनी त्यांच्या प्रभागात स्वच्छता होत नाही. पायवाटा, गटारे यांची कामे झालेली नाही, असा मुद्दा उपस्थित केला. प्रत्येक प्रभागातील मनसे नगरसेवकांसोबत आयुक्तांनी पाहणी दौरा करावा, अशी सूचना केली. त्याला आयुक्तांनी होकार दिला.डोंबिवलीतील बालभवनातील वाचनालय बंद आहे. ते चालवण्यासाठी डोंबिवलीतील पै फ्रेण्ड्स लायब्ररी इच्छुक आहे. त्याबाबत, लवकरच निर्णय घेऊन त्यांना वाचनालय चालवण्यास द्यावे, असे ठाकरे यांनी सांगितले. त्याबरोबर महापालिकेचा कला-क्रीडा हा विभाग २००५ पासून बंद आहे. त्याविषयी १२ बैठका होऊनही तो सुरू झालेला नाही. तो का सुरू करता येत नाही, याची माहिती दिली जात नाही. हा विभाग सुरू करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.
राज ठाकरे यांची सूचना मान्य, फेरीवाल्यांच्या तक्रारी यापुढे व्हॉटसअॅपवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:41 AM