कल्याण : मनसेच्या आंदोलनांची एकेकाळची रणभूमी असलेल्या आणि मतदारांनी भरभरून दान देऊनही पक्षाच्या धरसोड वृत्तीमुळे ते टिकवता न आलेल्या कल्याण-डोंबिवलीत मनसेच्या इंजिनाचे डबे घसरू नयेत, यासाठी पक्षाध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या दौ-यावर येणार आहेत. त्यात ते पक्षापुढे नवा कार्यक्रम ठेवतात, झाडाझडती घेतात की व्यूहरचना ठरवतात त्याकडे मनसेच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.मुंबई महापालिकेतील मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक फुटले. शिवसेनेने छक्के घेतले, अशी तिखट प्रतिक्रिया त्यानंतर राज ठाकरे यांनी दिली. केडीएमसीतील मनसेचे नऊ नगरसेवक शिवसेना किंवा भाजपाच्या गळाला लागू नयेत, यासाठी राज ठाकरे यांनी हा दौरा आखल्याची चर्चा आहे.२००८ साली कल्याण रेल्वे स्थानकात परप्रांतियांना मारहाण केल्याने राज ठाकरे चर्चेत आले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक करण्यात आली. पण या आंदोलनानंतर मराठीच्या मुद्द्यावर २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार निवडून आले. त्यात मनसेच्या इंजिनाने कल्याणमध्येही जोरदार धडक दिली. कल्याण ग्रामीण मतदारसंघातून रमेश पाटील, तर कल्याण पश्चिमेतून प्रकाश भोईर निवडून आले. २०१० सालच्या महापालिका निवडणुकीत मनसेचे २८ नगरसेवक निवडून आले. एका अपक्षाने मनसेला साथ दिली. पण मनसे तटस्थ राहिली. पुढे ती काही ठिकाणी शिवसेनेसोबत गेली. या धरसोड वृत्तीमुळे २०१४ सालच्या निवडणुकीत मनसेने कल्याण पश्चिम व कल्याण ग्रामीणची आमदारकी गमावली आणि महापालिका निवडणुकीत मनसेच्या जागा २८ वरून नऊवर आल्या. तो पक्ष विरोधी पक्ष म्हणून काम करतो आहे. २०१० च्या पालिका निवडणुकीत शिवसेना व भाजपाने उमेदवारी नाकारलेल्या मंडळींनी मनसेची वाट धरली होती. पण आताची मनसेची पीछेहाट पाहता ही मंडळी स्वगृही परतण्याच्या बेतात आहे. मनसेचे प्रमुख मोहरेच भाजपा आणि शिवसेनेच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. विरोधात राहून काही हाती लागत नाही, याचा विचार करून सहा नगरसेवकांनी शिवसेनेची वाट धरली. तशीच परिस्थिती कल्याण-डोंबिवलीत उद््भवू नये, यासाठी राज ठाकरे यांनी हालचाली सुरू केल्याचे सांगितले जाते.>अशा आहेत राज ठाकरे यांच्या भेटीगाठीराज ठाकरे गुरुवारी, २६ आॅक्टोबरला संध्याकाळी डोंबिवली जिमखान्यात येतील. २७ आॅक्टोबरला सकाळी सर्वेश सभागृहात ते डोंबिवलीतील मनसेच्या सर्व विंगच्या पदाधिकाºयांशी चर्चा करतील. दुपारी ३ ते ४ या वेळेत नगरसेवकांशी चर्चा करतील. नंतर व्यायामशाळेचे उद््घाटन करून पत्रकार परिषद, प्रतिष्ठित नागरिकांशी संवाद साधतील. २८ आॅक्टोबरला कल्याणच्या हॉटेलमध्ये पदाधिकाºयांशी चर्चा करून दुपारी मुंबईला रवाना होतील.
मनसेचे इंजिन सावरण्यासाठी राज ठाकरेंचा तीन दिवस तळ, कल्याण-डोंबिवलीत झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 2:03 AM