ठाणे : माहीम ज्युवेनाइल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखान्याचे माजी क्रिकेटपटू प्रकाश पुराणिक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित वरील स्पर्धेत राजावाडी क्रिकेट क्लबने अंतिम फेरीत स्पोर्ट्स फील्ड सी. सी. संघावर ९ गडी राखून विजय मिळवला. शनिवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी शिवाजी पार्क जिमखान्यावर खेळल्या गेलेल्या अंतिम फेरीतील सामन्यात स्पोर्ट्सफील्ड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली, परंतु राजावाडी क्रिकेट क्लबच्या गोलंदाजांच्या अचूक माऱ्यासमोर त्यांना २० षटकांत ४ गडी गमावून केवळ १०६ धावा जमवता आल्या.
कर्णधार वृषाली भगत आणि अलिना मुल्ला यांनी दुसऱ्या गड्यासाठी ८२ धावांची अभेद्य भागीदारी रचत ही धावसंख्या आरामात पार केली. वृषाली भगत हिने ५१ चेंडूत नाबाद ४६ धावा केल्या तर अलिना मुल्ला हिने ६० चेंडूत नाबाद ४० धावा केल्या. कर्णधार वृषाली भगत हिने मालिकावीर हा किताबही पटकावला. या संपूर्ण स्पर्धेत कर्णधार वृषाली भगत हिने कर्णधारपदाची धुरा अतिशय उत्तमरीत्या सांभाळली. सर्व सहकारी खेळाडूंना बरोबर घेऊन तिने लढवलेले डावपेच प्रत्येक सामन्यात यशस्वी ठरले. भविष्यातही तिला कर्णधार म्हणून यश मिळेल यात शंका नाही. भारताचे माजी क्रिकेट कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. याप्रसंगी बोलताना वेंगसरकर यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले व महिला खेळाडूंना महिला प्रीमियर लीगमध्ये खेळण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून जिद्दीने खेळत राहा असे सांगून मौलिक मार्गदर्शन केले तसेच राजावाडी क्रिकेट क्लबचे संचालक श्री. संजीव महाडकर क्रिकेटपटूंना निरनिराळ्या स्पर्धांमध्ये खेळवण्यासाठी घेत असलेल्या मेहनतीबद्दल व क्रिकेटपटूंना देत असलेल्या प्रोत्साहनाबद्दल, त्यांचे भरभरून कौतुक केले. याप्रसंगी दिवंगत क्रिकेटपटू प्रकाश पुराणिक यांच्या पत्नी व माजी क्रिकेटपटू प्रवीण आमरे उपस्थित होते.
दरम्यान, संघाचे व्यवस्थापन हेही जबाबदारीचे काम असते. या संघाचे व्यवस्थापक श्री. जयेश कुलकर्णी यांनी संघबांधणीसाठी घेतलेली मेहनत तसेच श्री. प्रतीश भोईर, श्री.दर्शन भोईर आणि श्री. संतोष चाफे यांच्या उत्तम प्रशिक्षणाचाही या विजयात फार मोठा वाटा आहे.