ठाणे : बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या देशातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांना ठाणे न्यायालयाने अखेर सोमवारी जामीन मंजूर केला. जवळपास महिनाभरापासून त्या कोठडीत होत्या.कुणाच्याही मोबाइल नंबरचा सीडीआर बेकायदेशीरपणे मिळवून तो विकणार्या टोळीचा पर्दाफाश गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक-१ ने गत महिन्यात केला. या प्रकरणी आतापर्यंत ११ आरोपींना अटक करण्यात आली. २ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी रजनी पंडित यांना अटक केली होती. पोलिसांनी अटक केलेल्या एका आरोपीजवळून रजनी पंडित यांनी सीडीआर मिळवल्याचा आरोप होता. सुरूवातीचे काही दिवस पोलीस कोठडी आणि नंतर जवळपास एक महिन्यापासून त्या न्यायालयीन कोठडीत होत्या. ठाण्याचे जिल्हा व सत्र न्यायाधिश ए.एस. भैसारे यांच्या न्यायालयात ६ मार्च रोजी त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली होती. या प्रकरणाचे गांभीर्य न्यायालयासमोर मांडून सरकारी पक्षाने त्यांच्या जामिनास विरोध केला. मात्र रजनी पंडित यांनी कुणाचाही सीडीआर विकत घेतला नाही किंवा कुणालाही विकला नसल्याचा युक्तिवाद अॅड. पुनम जाधव यांनी यावेळी केला. त्यांच्यामुळे कुणाचेही नुकसान झाले नाही. याशिवाय त्या ज्येष्ठ नागरिक असून, त्यांचे वय आणि आजार विचारात घेऊन जामीन अर्ज मंजूर करण्याची विनंती अॅड. जाधव यांनी केली. न्यायालयाने ती मान्य करून सोमवारी त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सोमवारी रजनी पंडित यांची तुरूंगातून सुटका होईल, अशी माहिती अॅड. पुनम जाधव यांनी यावेळी दिली.
सीडीआर प्रकरणात ठाणे न्यायालयाकडून रजनी पंडित यांना अखेर जामीन मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 8:06 PM
बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करून लोकांच्या मोबाईल फोनचे सीडीआर मिळवल्याच्या आरोपाखाली महिनाभरापासून गजाआड असलेल्या देशातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांना सोमवारी ठाणे न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केला.
ठळक मुद्देठाणे न्यायालयाचा दिलासामहिनाभरापासून होत्या अटकेतमंगळवारी होणार तुरूंगातून सुटका