बदलापूर : बदलापूर, पाटीलपाडा भागात ५० वर्षे माघी गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने भव्य देखावा उभारण्याची तयारी केली आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून महाल उभारण्यात येत आहे. १५ दिवसांपासून या ठिकाणी महाल उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे यंदा भाविकांची गर्दी वाढणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष उल्हास आंबवणे यांनी सांगितले.बदलापुरातील माघी गणेशोत्सव आणि त्यानिमित्त भरणारी १० दिवसांची जत्रा ही सर्वांच्या आकर्षणाचा विषय असतो. शहर वाढत असले, तरी या जत्रेचे महत्त्व मात्र कमी झालेले नाही. स्टेशन परिसरात मोकळी जागा नसली, तरी बदलापूरकर या जत्रेसाठी सर्व अडचणी बाजूला ठेवून काम करत आहेत. बदलापुरातील ही जत्रा आणि माघी गणेशोत्सव पाहण्यासाठी ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून भाविक येतात. भाविकांचा ओघ हा दरवर्षी वाढत असून या गणेशाला नारळ वाहणाºया भाविकांची संख्या ही सर्वाधिक आहे.यंदा या माघी गणेशोत्सवाचे पन्नासावे वर्ष असून त्यानिमित्ताने विविध कार्यक्र म मंडळाच्या वतीने होणार आहे. मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष दिमाखदार व्हावे, यासाठी १२ वर्षांपासून मंडळाची तयारी सुरू होती. तसेच या महोत्सवासाठी मंडळाने निधीची तरतूदही केली होती. वर्षभर सामाजिक कार्य करून मंडळाचे विविध उपक्रम सतत सुरूच असतात.भव्य महाल उभारण्याची तयारी करण्यात आली आहे. देसाई यांना हे महाल उभारण्याचे काम दिले आहे. दोन दिवसांत ते कामही पूर्ण करून गणेशाच्या स्वागतासाठी महाल सज्ज होणार आहे. या संपूर्ण महालात जाऊन गणेशाचे दर्शन घेण्याची संधी भाविकांना मिळणार आहे. त्यामुळे यंदाचा महोत्सव हा मंडळासोबत भाविकांसाठीही महत्त्वाचा आहे.देखाव्यासाठी महाल उभारला जात असला, तरी सामाजिक बांधीलकी जपत दरवर्षीप्रमाणे यंदादेखील अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहे. बदलापूरमधील सर्वात मोठे रक्तदान शिबिर यावेळी घेण्यात येणार आहे. बदलापूर परिसरातील गतिमंद मुलांच्या संस्थेला भरीव मदतीचा हात मंडळाच्या वतीने देण्यात येणार आहे. सोबत, महाआरोग्य शिबिर, चष्मेवाटप कार्यक्रमही घेण्यात येणार असल्याचे अविनाश खिल्लारे म्हणाले.१०१ ढोल पथकांची मानवंदनादरवर्षीची वाहतूककोंडी टाळण्यासाठी यंदा वेगळी व्यवस्था केली जाणार असून वाहतुकीवर परिणाम होऊ न देता उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न असल्याचे कार्याध्यक्ष वीरेश धोत्रे यांनी सांगितले. उद्या गणेशाचे आगमन होणार असून २१ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. यात १०१ ढोल पथकांची मानवंदना देण्यात येणार असून पारंपरिक पद्धतीने ही मिरवणूक निघणार आहे.
देसार्इंच्या संकल्पनेतून राजमहालाची प्रतिकृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:30 AM