भिवंडी - रक्षाबंधन सण म्हणजे भाऊ बहिणींच्या नात्यातील एक अविस्मरणीय दिवस. या निमित्त बहीण भावाच्या हातावर राखी बांधते तर भाऊ बहिणीच्या रक्षणाची ओवाळणी देतो . याच रक्षाबंधन सणाचे औचित्य साधत भिवंडी शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने केलेल्या गॅस दरवाढीचा निषेध करण्यासाठी प्रतिकात्मक रक्षाबंधन आंदोलन शनिवारी करण्यात आले.
जकात नाका येथील स्व. आनंद दिघे चौकात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात एका व्यक्तीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोचे मास्क लावून, त्यांना ओवाळत राखी बांधण्यात आली आणि त्यांनाच गॅस सिलेंडर भेट देऊन, आम्ही आमची रक्षा करण्यासाठी समर्थ आहोत. तुम्ही फक्त गगनाला गवसणी घालणाऱ्या गॅस सिलेंडरच्या किमती कमी करा, अशी मागणी करण्यात आली."
मोदी भय्या राखी के बंधन को निभाना, गॅस का दाम कम कराना" अशी मागणी या महिला कार्यकर्त्यांनी ओवाळणीच्या स्वरुपात पंतप्रधान मोदींकडे मागितली. गाणे म्हणत केलेले हे आंदोलन सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते.