ठाणे - 'रक्षण ' आणि 'आदर ' केवळ बहीण आणि रक्षाबंधन पुरता मर्यादित न राहता प्रत्येक महिलेप्रती तो आदरभाव असावा, यासाठी पुरुषांच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी अर्थ फाउंडेशनतर्फे 'नवा अर्थ पुरुषार्थ' या उपक्रमाला ठाणे शहरातील जोशी बेडेकर विद्यालयातील कार्यक्रमाने सुरुवात झाली. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर,मनपा आयुक्त संजीव जयस्वाल, पोलीस उपायुक्त अविनाश अंभोरे, संजय केळकर, निरंजन डावखरे, सिने दिग्दर्शक विजू माने, भाजप शहरअध्यक्ष संदिप लेले यांनी 500 विद्यार्थ्यांसह महिलांना सन्मान व आदर देण्याची शपथ घेतली. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी या अभिनव उपक्रमाला शुभेच्छा देत मुलांच्या जाणीव जागृतीची आवश्यकता असल्याचे सांगितले.
अविनाश अंभोरे यांनी मुलांना पोलीस दूत होऊन रक्षणकर्ते होण्याचे आवाहन केले. संजीव जयस्वाल यांनी वैयक्तिक तसेच प्रशासकीय सहभागातून चळवळ पुढे नेण्यास कटीबद्ध असल्याचे सांगितले. तर विजू माने यांनी मुलांशी संवाद साधत दैनंदिन जीवनात महिलांना कसा आदर देता येईल ते समजावले. या निमित्ताने विजू माने यांनी या विषयाला अनुसरून तयार केलेल्या चित्रफितीचे अनावरण करण्यात आले.सर्व मान्यवरांनी या उपक्रमाबद्दल अॅड.माधवी नाईक यांचे अभिनंदन करून या विषयाशी संबंधित उपक्रमांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. हा उपक्रम रक्षाबंधन ते भाऊबीज या कालावधीत संपूर्ण राज्यातील शाळा,महाविद्यालये व कार्यालयांत संपन्न होणार आहेत.