पालघर - पोलिसांनी केलेल्या दडपशाहीच्या विरोधात पालघर जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनांनी आज पालघर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या दोन पत्रकारांना पोलिसांनी कलम ३५३ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्याचा निषेध कऱण्यासाठी तसेच या पत्रकारांवरील गुन्हे मागे घ्या, संबंधित पोलिसानंना बडतर्फ करा अशा मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. मात्र पोलीस अधीक्षकांनी या मागण्या फेटाळल्याने पुढील आठवड्यात नागपूर अधिवेशनावर धडक देण्याचा निर्णय पत्रकारांनी घेतला आहे.
२२ जून रोजी पालघर मध्ये पडलेल्या दरोड्याच्या घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या राम परमार आणि हुसेन खान या दोन पत्रकारांवर पालघर पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप करत गुन्हे दाखल केले होते. या पत्रकारांनी पोलिसांवर हात उचलला असा आरोप करत त्यांच्यावर नव्याने सुधारणा झालेले कलम ३५३ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. हे गुन्हे केवळ सत्र न्यायालयात वैध असल्याने या पत्रकारांना जामीन मिळविण्यासाठी ४ रात्र न्यायालयीन कोठडीत काढावी लागली. या घटनेचा निषेध करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनांनी पालघर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. आज सकाळी ११ वाजता पालघरच्या हुतात्मा चौकातून पत्रकारांचा मोर्चा निघून तो पालघर पोलीस ठाण्यावर धडकला. या मोर्च्यात दिडशेहून अधिक पत्रकार सहभागी झाले होते. वार्तांकन करणे हा गुन्हा असेल तर आम्हाला अटक करा असे पत्रकारांनी सांगितले. मात्र पोलिसांनी अटक केली नाही. या दोन्ही पत्रकारावंरील गुन्हे मागे घ्या, बेकायदेशीर अटक करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करा अशा मागण्या करण्यात आल्या. मात्र पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी या मागण्या मान्य न करता पोलिसांची बाजू घेतली. त्यामुळे पोलिसांविरोधात आता नागपूर अधिवेशनात दाद मागण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे. १२ जून पालघर जिल्ह्यातील पत्रकार नागपूर येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनावर धडक देणार आहे. पत्रकारांना मध्यरात्री बनियान, चड्डीमध्ये असताना अटक केली. त्यामुळे नागपूर अधिवेशनात पत्रकार चड्डी, बनयान घालून आंदोलन करणार आहेत. पत्रकारांना घातक असलेले कलम ३५३ रद्द करावे, पोलीस अधीक्षकांचीही बदली करावी या मागण्या मुख्यमंत्र्याकडे करण्यात आल्या आहेत.