ठाणे : विधानसभा निवडणुकीतील प्रचारासाठी रविवारचा सुटीचा मुहूर्त साधून १८ मतदारसंघातील सर्वच उमेदवारांनी गल्लोगल्ली, घरोघरी जाऊन मतदारांना प्रत्यक्ष भेटून, चौकसभा घेऊन प्रचाराचा धुराळा उडविल्याचे दिसून आले. मतदानाआधी प्रचारासाठी अवघा आठवडाभराचाच कालावधी शिल्लक राहिला असून त्यातही हा शेवटचा रविवार असल्याने मतदारसंघातील प्रत्येक कानाकोपरा पिंजून काढण्यासाठी उमेदवारांमध्ये जणूकाही रस्सीखेच दिसून आली.प्रचारफेऱ्या, बाइक रॅली, चौकसभांनी रविवारी जिल्ह्यातील वातावरण खºया अर्थाने तापल्याचे दिसून आले.
आपल्या मतदारसंघामध्ये प्रत्येकाने ताकद असो किंवा नको, परंतु रविवारच्या सुटीचा मुहूर्त साधून जोरदार शक्तिप्रदर्शन करताना उमेदवारांचे कसब पणाला लागल्याचे चित्र दिसत होते. विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पहिल्या आठवड्याचा रविवार हा बहुतेक उमेदवारांना आपले ‘तिकीट कन्फर्म’ करण्यात गेला. त्यामुळे ६ आॅक्टोबरचा थोड्याफार प्रमाणात प्रचार करण्यात आला. तर, २१ आॅक्टोबरला प्रत्यक्ष मतदान असल्याने शनिवारी १९ तारखेलाच प्रचाराची मुदत संपणार आहे. त्यामुळे २० आॅक्टोबरचा रविवारही हातातून निसटला आहे.
निवडणूक प्रचारासाठी यावेळी जेमतेम १५ दिवसच उमेदवारांना मिळाले आहेत. त्यामुळे १३ आॅक्टोबरचा हा एकच महत्त्वाचा रविवार उमेदवारांच्या हातात होता. त्यामुळे ठाण्यातील चारही मतदारसंघांत प्रचाराचा नुसता धुराळा उडाल्याचे दिसून आले.संपूर्ण जिल्हा झाला निवडणूकमयशिवसेना, भाजप, काँग्रेस, मनसे, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष उमेदवारांनीही आजच्या दिवसात मतदारसंघ पिंजून काढला. काही ठिकाणी रॅली, रोड शो, घरोघरी भेटी आणि चौकसभांच्या माध्यमांतून सर्वपक्षीय उमेदवारांनी प्रचाराची संधी साधली. झेंडे, बॅनर्स आणि घोषणाबाजीने संपूर्ण माहोल निवडणूकमय झाल्याचे पहिल्यांदा ठाणेकरांनी अनुभवले.दोघा उमेदवारांनी तर तरुणांना आकर्षित करण्यासाठी हातात बॅट घेऊन चौकार, षटकार ठोकून प्रचाराचे षटकार ठोकण्याचा प्रयत्न केला. कुठल्या भागात आपले मतदार जास्त आहेत, त्या भागांवर प्रत्येक उमेदवाराने अधिकचा भर दिल्याचे दिसून आले.ठिकठिकाणी चौकसभा घेऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्नही या माध्यमातून झाला. काहींनी मॉर्निंग वॉकच्या स्पॉटवर जाऊन ज्येष्ठांसह तरुणांना मतदानाचे अपील केले. रविवारी पहाटे ६ ते रात्री थेट १० पर्यंत नॉनस्टॉप प्रचार रॅली, चौकसभांवर भर दिला. नवी मुंबईतही राष्टवादीने वाशीत रॅली काढली. ऐरोलीत भाजपाने कोपरखैरणे परिसरात दणदणाट केला. बेलापूर मतदारसंघात भाजपने पामबीचवर रॅली काढली.